संगमनेरमध्ये गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा; ४५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 


“संत-महात्म्यांच्या दर्शनाने मानवी जीवन चैतन्यमय होते. प.पू. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज हे रामकथा सत्संगाचे भव्य धर्ममंडप उभे राहिले असून, हे केवळ मंडप नसून संस्कार, भक्ती आणि अध्यात्माचे विद्यापीठच आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले.

संगमनेर येथील गुंजाळ मळा येथे स्व. जयवंतराव गुंजाळ व श्री. बाळासाहेब गुंजाळ पाटील यांच्या वतीने आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वात ते बोलत होते. आपल्या ओजस्वी आणि भावस्पर्शी वाणीतून ढोक महाराजांनी रामकथेतील विविध पैलू उलगडत भाविकांना भक्तीच्या अमृतधारेत चिंब भिजवले.

वियोगाच्या प्रसंगाने भाविक गहिवरले


रामकथेतील चौथ्या दिवसाचे महत्त्व सांगताना महाराज म्हणाले की, हा दिवस वियोगाचा असतो. कैकयीला दिलेल्या वरामुळे प्रभू रामांना वनवासात जावे लागले. या विरहाने राजा दशरथांनी केलेला अन्नत्याग आणि पुत्राच्या वियोगात दिलेले प्राण, हा प्रसंग ढोक महाराजांनी इतक्या प्रभावीपणे मांडला की उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. तत्पूर्वी, भगवान परशुराम आणि राम-लक्ष्मण भेटीचा प्रसंग सांगताना त्यांनी रामाच्या तेज आणि आज्ञाधारकपणाचे कौतुक केले.

 

मुलीचा बाप’ हा जगातील श्रेष्ठ दाता


जनक राजाच्या चार कन्यांच्या विदाईचा प्रसंग सांगताना ढोक महाराज भावूक झाले. “मुलीचा पिता कधीही कमी नसतो, तो खरा ‘दानी’ असतो. कन्यादान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे,” असे सांगताना त्यांनी शकुंतला-कण्वमुनी आणि पार्वती-हिमालय यांच्या विरहाची उदाहरणे दिली. प्रत्येक बापाच्या अंतर्मनातील वेदना त्यांनी आपल्या निरूपणातून शब्दबद्ध केल्या.

विवाहातील दिखाऊपणावर प्रहार; ‘दांडके मंडळ’ स्थापन करा


सध्याच्या विवाह पद्धतीतील अनिष्ट प्रथांवर महाराजांनी कडक शब्दांत टीका केली. “विवाहातील मुहूर्त पाळण्याऐवजी आज दिखाऊपणाला महत्त्व दिले जात आहे. वधूपित्याला होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास थांबवण्यासाठी गावागावात तरुणांनी ‘दांडके मंडळ’ स्थापन करून विवाहामध्ये शिस्त आणली पाहिजे,” अशी रोखठोक सूचना त्यांनी केली. तसेच, वेळेचे महत्त्व सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, राम-सीतेच्या विवाहात काही क्षणांचा विलंब झाला असता, तर कदाचित चौदा वर्षांचा वनवास टळला असता; परंतु जे घडायचे होते ते वेळेच्या गतीने घडले.

४५ हजार भाविकांनी घेतला खिचडीचा आस्वाद


या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कृष्ण ‘कमला एकादशी’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला महाप्रसाद. संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातून आलेल्या सुमारे ४५ हजार भाविकांनी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद ग्रहण केला. गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले.

या आध्यात्मिक सोहळ्याला रामानंदाचार्य, गोविंददेवगिरी

महाराज, आत्मामलिक श्री जंगली महाराज यांसह अनेक संत-महंतांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. संगमनेरच्या प्रसारमाध्यमांनी या कथेच्या प्रसारासाठी केलेल्या योगदानाचेही ढोक महाराजांनी यावेळी कौतुक केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *