संगमनेर । झुंझार न्यूज
आज नुकतीच नव्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून सह्याद्री विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक देऊन उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. बालपणीच्या अनेक आठवणी विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात असतात. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत व्हावे म्हणून सह्याद्री विद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष मैथिली तांबे, विद्यालयाचे प्राचार्य मा. एस.एम. खेमनर , उपप्राचार्या श्रीमती एस.एन. दिघे, पर्यवेक्षक के.डी. देशमुख, पर्यवेक्षिका श्रीमती एस.आर. रणशुर, शिक्षक प्रतिनिधी ए.एम. गुंजाळ, नगरसेवक अमोल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ मैथिली तांबे म्हणाल्या कि , “शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते. शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांनीही संगमनेरच्या मातीत रुळावे. सह्याद्री विद्यालय हे संगमनेरचे भूषण असून येथून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती घडल्या आहेत. चुका झाल्या तरी खचू नका, कारण चुकांमधूनच शिकायला मिळते. मोबाईल व टीव्हीचा वापर मर्यादित ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक मैदानी खेळ व एक छंद जोपासावा. योग्य आहार व पुरेशी झोप यामुळे शरीर व मनाचा विकास होतो.” त्यांनी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून विद्यालयात सुरक्षित व आनंददायी वातावरण असल्याचे नमूद केले.

एस.एम. खेमनर म्हणाले की, सहकार महर्षी आदरणीय भाऊसाहेब थोरात (दादांनी ) बहुजन समाजाच्या मुलांसाठी या संस्थेची स्थापना केली. माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात , मा आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची व विद्यालयाची प्रगती चालू आहे. विद्यालयाच्या अडचणी सोडविणे कामी आ. सत्यजित दादा तांबे यांचे सहकार्य लाभते.नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असते .या विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत 2000 पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेतात. इथे मुलांची गुणवत्ता व संस्कार यांना महत्त्व दिले जाते”. नव्या विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाला नवी ऊर्जा मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याला वाव देण्याचे काम इथले शिक्षक सदैव करत असल्याचेही ते म्हणाले

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
