आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे सोमवती अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर एक आगळावेगळा सेवाभावी उपक्रम पार पडला. ‘विठाई परिवार महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण गोशाळा (आनंद दिवाकर तीर्थ) येथील १२५ देशी वंशाच्या गोमातेंसाठी भव्य ‘धोंडा पंगत’ आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी गाईंना ५१ किलो बदाम आंब्यांचा आमरस आणि ७० किलो गुळाच्या लापशीचा नैवेद्य अर्पण करून तृप्त करण्यात आले.


विठाई परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध तीर्थयात्रा, धार्मिक सहली तसेच आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून दर महिन्याच्या अमावस्येला गोशाळेतील गाईंना ७० किलो गुळाची लापशी खाऊ घातली जाते. तसेच, संस्थेमार्फत वेळोवेळी हिरव्या चाऱ्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. सोमवती अमावस्येचे औचित्य साधून यावेळी आमरसाची विशेष मेजवानी जोडण्यात आली होती.


या उपक्रमाविषयी माहिती देताना विठाई टूर्सचे संचालक ह.भ.प. डॉ. मुकुंद जोरी पाटील यांनी सांगितले की, “यंदाचा पुरुषोत्तम मास (अधिक मास) अत्यंत दुर्मिळ योगावर आला होता. या मासाची सुरुवात शनी जयंती आणि शनी अमावस्येने झाली, तर सांगता सोमवती अमावस्येने झाली आहे. असा योग शेकडो वर्षांनंतर जुळून आला आहे. पुरुषोत्तम मास हा पुण्य फलदायी मानला जातो, म्हणूनच या काळात गो-सेवा आणि अन्नदान करणे विशेष महत्त्वाचे आहे.

पवित्र अधिक महिन्यात गो-सेवेचा आनंद घेत विठाई परिवाराने आपला संकल्प पूर्ण केला. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी अशा अन्नदानाच्या आणि सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन पुण्यार्जन करावे, असे आवाहनही डॉ. मुकुंद जोरी पाटील यांनी केले.


या उपक्रमासाठी विठाई परिवाराचे सदस्य आणि गोशाळेचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ७०२८२८४३१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *