ऐतिहासिक वारसा जतन आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी उपक्रम

संगमनेर । झुंझार न्यूज

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेर येथील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ला, कुसूर येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली. ही मोहीम पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी राबवण्यात आली असून, त्यात विद्यार्थ्यांनी मनापासून उत्साहाने सहभाग घेतला.

शिवनेरी किल्ला हा केवळ महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा ठसा नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला पवित्र स्थळ आहे. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि इतर कारणांमुळे किल्ल्याच्या परिसरात प्लास्टिक, कचरा व इतर दूषित पदार्थ वाढले होते. याची जाणीव ठेवून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली.

मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते वरच्या भागापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागद, पाने आणि इतर कचरा गोळा करून तो योग्य ठिकाणी टाकण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातात झाडू, कचरा पिशव्या घेऊन उत्साहाने काम केले. काही विद्यार्थ्यांनी किल्ल्याच्या भिंतींना लागून असलेल्या झाडांखाली आणि खडकांमध्ये साचलेला कचरा काढला. या उपक्रमात महिला विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी यावेळी म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर समाज आणि देशासाठी जबाबदारी घेणे हेही महत्त्वाचे आहे. शिवनेरीसारख्या पवित्र स्थळाचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आमचे विद्यार्थी केवळ कृषी क्षेत्रातील व्यावसायिक नव्हे तर, सामाजिक जाणीव असलेले जबाबदार नागरिक बनतील, अशी आमची अपेक्षा आहे.”


प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर यांनी सांगितले की, “या प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची आणि वारसा जतन करण्याची भावना वाढते. भविष्यात असे उपक्रम नियमितपणे घेण्याचे आमचे नियोजन आहे.”

या स्वच्छता मोहिमेमुळे सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी याविषयीची जागृती निर्माण झाली. हा उपक्रम ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘हरित महाराष्ट्र’ या संकल्पनेशी सुसंगत असल्याचे मानले जाते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेर हे केवळ कृषी शिक्षण देणारे महाविद्यालय नसून, सामाजिक बांधिलकी असलेली संस्था म्हणूनही ओळखले जाते. अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयाची सामाजिक प्रतिमा अधिक उजळली गेली आहे.

या स्वच्छता मोहीम अभियानाचे  माजी कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी धुमाळ, डॉ. जे बी गुरव,यांनी अभिनंदन केले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *