संगमनेर । झुंझार न्यूज
“एकही संत देवाकडे गेला नाही, तर संत हेच स्वतः देव झाले. संतांनी स्वतःचे आयुष्य राखरांगोळी करून समाज सुखी केला. त्यामुळे आपल्या मातीतील माणसे आपणच मोठी केली पाहिजेत,” असे परखड प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात ‘काल्याच्या कीर्तनात’ ते बोलत होते.

यावेळी इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास विनोदी, मिश्किल आणि प्रबोधनात्मक शैलीत श्रोत्यांना खिळवून ठेवतानाच समाजातील विसंगतींवर सडकून टीका केली.
कीर्तनादरम्यान महाराजांनी माणसाच्या बाह्य आणि अंतर्मनाचा वेध घेतला. ते म्हणाले की, “लोक परमार्थिक अवसान आणतात, पण खरा आनंद अंतर्मनात असतो. आज ८० टक्के लोकांना नोकरी करणारा आणि शेती असलेला जावई हवा असतो, पण आपल्या मुलीला शेतात पाठवायचे नसते.” या विधानावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जग खोटे असू शकते; पण संत, ग्रंथ आणि आई-वडील हेच खरे दैवत आहेत, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

‘मारुतीराया देव नाही, तर रक्षक’
आध्यात्मिक विवेचन करताना महाराज म्हणाले की, “मारुतीराया देव नाही, तर तो रक्षक आहे. जो प्रामाणिक असतो, त्याच्यात मायेचा ओलावा असतो.” तसेच, लंकेचे उदाहरण देताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली की, “लंका सोन्याची होती म्हणून देवाने तिथे माणसाला पाठवले नाही, कारण ९० टक्के माणसे सोने पाहून बदलतात.”

आरोग्यासाठी ‘भजन’ हेच औषध
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेला मानसिक तणाव, रक्तदाब (BP) आणि मधुमेहावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मानसिक तणावावर ‘भजन’ हे सर्वोत्तम औषध आहे. हसत-खेळत जगण्याचा संदेश देत त्यांनी ‘परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी’ या शब्दांचा आध्यात्मिक अर्थ विशद केला.

तालुक्यात ‘छत्रपती सप्ताहा’चे आयोजन करा
गुंजाळवाडीतील सप्ताहाच्या शिस्तीचे कौतुक करताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “या सप्ताहाने एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. गगनगिरी भक्तांची संघटनशक्ती वाखाणण्याजोगी आहे. आता भविष्यात तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह’ देखील आयोजित व्हायला हवा.” बहिणाबाई चौधरी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी गगनगिरी महाराजांच्या कुळाला धन्य मानले.

खंडोबाराया अहिल्यानगरचे जावई!
कीर्तनात खंडोबा, म्हाळसा आणि बानाई यांचा संदर्भ देताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “खंडोबाराया हे अहिल्यानगरचे जावई आहेत. जर आजच्या काळात खंडोबाराया असते, तर त्यांचेही आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड निघाले असते.” त्यांच्या या कोटीवर ज्ञानमंडपात हास्याचे कारंजे उडाले.

