आश्वी । झुंझार न्यूज 

 

राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संगमनेर येथील निळवंडे धरण व उर्ध्व कालवा विभागाच्या वतीने रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “वाढदिवसावर होणारा अवांतर खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवा,” या मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.

 

या शिबिराचा शुभारंभ निळवंडे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी नामदार विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आणि विभागातील कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी उपअभियंता प्रमोद माने, कुणाल चोपडे, ए. पी. शेख, जगदीश दारोळे यांसह विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये विभागातील अधिकारी, पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. एकूण ३५ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ‘आधार रक्तदान केंद्र’चे संस्थापक प्रदीप जाधव आणि डॉ. शैलेश तोरकडी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलन करण्यात आले.

रक्तदानासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. यासाठी ‘मेडीकव्हर हॉस्पिटल’चे विशेष सहकार्य लाभले. हॉस्पिटलचे डॉ. संतोष गोडसे, डॉ. भाग्यश्री महाजन, सिस्टर साक्षी पाटील, मनीषा घेगडमल यांच्या पथकाने उपस्थितांची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.

नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे किंवा अनावश्यक खर्च न करता, त्याऐवजी शालेय साहित्य वाटप, रक्तदान किंवा इतर सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व प्रशासनाला केले होते. याच आवाहनाचे पालन करत निळवंडे धरण व कालवा विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *