२ जुलै २०२६ रोजी संगमनेर तहसीलवर धडकणार ‘भीमगर्जना’ मोर्चा
आश्वी । झुंझार न्यूज
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर विश्रामगृह येथे सर्वपक्षीय आंबेडकरी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. “उपवर्गीकरण म्हणजे बौद्ध समाजाची ताकद कमी करण्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे,” असा सूर या बैठकीत उमटला. या निर्णयाच्या निषेधार्थ आगामी २ जुलै २०२६ रोजी संगमनेर तहसील आणि प्रांत कार्यालयावर सर्व आंबेडकरी पक्ष व गटांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव होते. यावेळी बोलताना नेते आणि कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “आज बौद्ध समाजात जाणीवपूर्वक दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर आपण आता एकसंघ झालो नाही, तर भविष्यात नेपाळसारखी अस्थिर परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. नगर जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे, मात्र आता आपल्यात गटतट पाडून वर्गीकरणाची कुऱ्हाड चालवली जात आहे,” असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

बैठकीत उपस्थित नेत्यांनी आरोप केला की, संघाच्या (RSS) विचारसरणीचे लोक काही विशिष्ट व्यक्तींना पुढे करून समाजाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार उपवर्गीकरणाचा बौद्ध समाजाला तोटा नाही, असा भास निर्माण केला जात असला तरी, प्रत्यक्षात हे पाऊल समाजासाठी अत्यंत घातक आहे. समाजाचा एक मोठा हिस्सा अजूनही या विषयावर जागृत नाही, ही चिंतेची बाब आहे.
पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर उपवर्गीकरण रोखणे अनिवार्य आहे. यासाठी केवळ शहरात नव्हे, तर ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्येक कुटुंबाला उपवर्गीकरणाचे तोटे समजावून सांगण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर समाजाची शक्ती विखुरली जाऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीत माणिकराव यादव , ॲड. किरण रोहोम, आशिष शेळके , राजू खरात, संजयकुमार गायकवाड , किशोर चव्हाण, गणेश बोराडे, प्रवीण गायकवाड, अनिल भोसले, सोमनाथ गायकवाड, रवी दिवे यांनी आपले विचार मांडले आणि उपवर्गीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची गरज व्यक्त केली.

या बैठकीस बाळासाहेब गायकवाड, कैलास कासार, बापू रणधीर, विजय खरात, योगेश मुन्तोंडे, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम , अनिल बर्डे , मधुकर सोनवणे , बंटी यादव , गायकवाड यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, गट आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

