आश्वी । झुंझार न्यूज
पुणे-शिर्डी प्रवासासाठी पर्यायी मार्ग म्हणून मंजूर झालेल्या आश्वी-पानोडी-शिबलापूर व्हाया पुणे – शिर्डी या महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पानोडी गावठाण ते शिबलापूर या टप्प्यातील रस्त्याचे काम रखडल्याने सध्या या गावात ‘चिखलाचे साम्राज्य’ पसरले आहे. उन्हाळ्यात धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

पुणे-शिर्डी या मुख्य रस्त्याला पर्याय म्हणून या मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. रस्त्याचे बरेचसे काम पूर्ण झाले असले तरी, वर्षभरापूर्वी पानोडी घाट ते शिबलापूर दरम्यानचा रस्ता खोदण्यात आला. त्यापैकी घाटापासून गावठाणापर्यंत अर्धा रस्ता अत्यंत धिम्या गतीने पूर्ण झाला, परंतु पानोडी गावठाण ते शिबलापूर या पुढील मार्गाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
सध्या सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे संपूर्ण पानोडी गाव चिखलमय झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. या चिखलातून वाट काढताना शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध आणि वाहनचालकांना नाकीनऊ येत आहे. विशेषतः शेतकरी आणि दूध उत्पादक वाहने चालवताना हवालदिल झाले आहेत.
एकीकडे रस्ता खराब असतानाच, दुसरीकडे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे कॉंक्रिटीकरण आणि मुरुम वाहतूक करणाऱ्या मोठ्या डंपरची या मार्गावरून वेगाने वर्दळ सुरू असते. महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रहदारी वाढली आहे, मात्र रस्ता चिखलमय असल्याने महिला व मुलांना जीव मुठीत धरून पायी चालावे लागत आहे. अवजड वाहनांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे.

रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने आणि पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. “हा रस्ता कधी पूर्ण होईल आणि या चिखलाच्या विळख्यातून आमची मुक्तता कधी होईल?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Post Views: 163

