आश्वी । झुंझार न्यूज

राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळत असतानाच, जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या संगमनेर तालुक्यात राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. या ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः ‘जोर्वे’ आणि ‘आश्वी’ या दोन जिल्हा परिषद गटांतील लढत संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरत आहे.


जोर्वे गट: थोरातांचे ‘माहेर’ आणि विखेंचा ‘बालेकिल्ला’

जोर्वे जिल्हा परिषद गटाची भौगोलिक रचना ही राजकीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गटातील निम्मी गावे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात येतात, तर उर्वरित निम्मी गावे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. जोर्वे हे गाव बाळासाहेब थोरातांचे ‘माहेर घर’ मानले जाते, तर याच भागात विखे पाटलांचेही मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे या गटात होणारा विजय म्हणजे प्रतिस्पध्याच्या घरात शिरून मिळवलेला विजय मानला जाईल.


उमेदवारीसाठी चुरस

यावेळी जोर्वे गटासाठी ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ (OBC) आरक्षण पडले आहे.

थोरात गट: या गटाकडून शरद नाना थोरात यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे.

विखे गट: विखे गटाकडून गोकूळ दिघे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून तरुणासह लोकांमध्ये संपर्क वाढताना दिसत आहे.

महायुतीतील पेच: भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर यांच्यासाठी, तर रिपब्लिकन पक्षाने आशिष शेळके यांच्यासाठी या जागेवर दावा ठोकला आहे. यामुळे महायुतीत उमेदवारीचे वाटप कसे होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


आश्वी गटात ‘महिलाराज’; पुरुष इच्छुकांची निराशा

आश्वी जिल्हा परिषद गटात तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरक्षणाची सोडत जाहीर झाली. मात्र, या गटावर ‘ओबीसी महिला’ आरक्षण पडल्याने अनेक मातब्बर पुरुष उमेदवारांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द या दोन्ही गणांमध्येही महिला आरक्षण असल्याने आता या भागात खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे.


राजकीय समीकरणे

आश्वी गटात जरी थोरात गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या जास्त असली, तरी मागील विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना याच भागातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथील मतदार ‘हाता’ला साथ देणार की ‘कमळा’ला, हे मोठे कोडे आहे.


कार्यकर्त्यांमधील मरगळ आणि बदलती भूमिका

निवडणुका वारंवार लांबणीवर पडल्याने इच्छुकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. २०२५ च्या दिवाळीत फटाके फुटतील अशी आशा असताना आता २०२६ उजाडले आहे.


थोरात गटाची स्थिती: थोरात गटाचे खंदे समर्थक विजय हिंगे हे सध्या ‘बॅकफुट’वर असल्याचे दिसत आहे. आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत आणि इतर विकासकामे मार्गी लावण्यात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांची भूमिका सध्या ‘तळ्यामळ्यात’ असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. निधी अभावी विकासकामे रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी सुप्त नाराजी आहे.


विखे गटाची रणनीती: दुसरीकडे, विखे गटाने शिस्तबद्ध पद्धतीने बांधणी सुरू केली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या छुप्या चाली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली रसद यामुळे विखे गट आक्रमक पवित्र्यात दिसत आहे.


जिल्हा परिषदेची ही निवडणूक म्हणजे येणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणुकीची ‘रंगीत तालीम’ मानली जात आहे. सहकार आणि सत्तेच्या जोरावर कार्यकर्त्यांचे जाळे विणलेल्या या दोन्ही नेत्यांसाठी हा केवळ सत्तेचा प्रश्न नसून वर्चस्व टिकवण्याची लढाई आहे.


ऐन दिवाळीच्या काळात निवडणुकीचे वारे वाहणार असल्याचे संकेत मिळत असल्यान संगमनेरच्या ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. जोर्वे आणि आश्वीच्या आखाड्यात गुलाल कुणाचा उधळला जातो आणि विखे-थोरातांच्या या संघर्षात कोण बाजी मारणार, याचा फैसला आगामी काळात जनताच करणार आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *