आश्वी । झुंझार न्यूज

लोकशाहीमध्ये जनता हाच खरा राजा असतो आणि या राजाच्या अडचणी सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे,” हाच विचार घेऊन जलसंपदामंत्री ना. डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुक येथील ‘जनसेवा’ कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनता दरबार’ कार्यक्रमास शिर्डी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिन्याच्या ठराविक दिवशी भरणारा हा दरबार आता केवळ तक्रारींचे केंद्र राहिला नसून, तो सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षेचा एक भक्कम आधारवड बनला आहे.


विखे पाटील परिवाराची आणि जनता दरबाराची एक अतूट नाळ गेल्या अनेक दशकांपासून जोडली गेली आहे. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेली ही लोकसेवेची परंपरा आजही तितक्याच तत्परतेने सुरू आहे. लोणी, प्रवरानगर, शिर्डी, अहिल्यानगर आणि अगदी मुंबईपर्यंत या जनता दरबाराचे लोण पसरले आहे. सामान्य माणसाला मंत्र्यांपर्यंत किंवा मोठ्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणे कठीण वाटते, मात्र विखे पाटलांच्या दरबारात कोणताही सामान्य नागरिक थेट संवाद साधू शकतो, हीच या उपक्रमाची मोठी उपलब्धी आहे.


या जनता दरबारामध्ये महसूल, वीज वितरण , पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, शिक्षण आणि नोकरीविषयक विविध समस्या नागरिक मांडतात. केवळ समस्या मांडणेच नव्हे, तर आलेल्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला जातो. नियमानुसार आणि कालबद्ध मर्यादेत हे प्रश्न सुटावेत, यासाठी कडक सूचना दिल्या जातात. प्रशासकीय कामातील दिरंगाई दूर करून पारदर्शकता आणण्यावर येथे विशेष भर दिला जातो.


डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने प्रवरा नगर, लोणी, शिर्डी आणि खडकेवाके परिसरात भरणाऱ्या दरबारात तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो. रोजगाराच्या संधी, शैक्षणिक अडचणी आणि शासकीय योजनांचा लाभ यावर येथे सविस्तर चर्चा होते. तर दुसरीकडे, वयोवृद्ध नागरिक आपल्या पेन्शन किंवा जमिनीच्या वादाच्या समस्या घेऊन विश्वासाने येतात.


हा जनता दरबार केवळ तक्रारींपुरता मर्यादित नाही. येथे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक विषयांवरही चर्चा होते. गावपातळीवरील प्रश्नांपासून ते देशपातळीवरील धोरणांपर्यंत विचारांची देवाणघेवाण येथे होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितार्थ योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात व्हावी, यासाठी अधिकार्यांच्या बैठका घेऊन त्यांना निर्देश दिले जातात.


एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाच्या प्रश्नाचे समाधान होत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील,” अशी भावना विखे पाटील परिवाराकडून व्यक्त करण्यात येते आहे . जनसेवा कार्यालय हे जनतेसाठी २४ तास खुले असून, पारदर्शक कारभार हेच या कार्यालयाचे ब्रीदवाक्य ठरले आहे.


आज शिर्डीकर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेसाठी हा जनता दरबार म्हणजे ‘न्याय मिळण्याचे हक्काचे ठिकाण’ बनले आहे. या उपक्रमामुळे शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी झाले असून, खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होताना दिसत आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *