सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
संगमनेर । झुंझार न्यूज
सोमेश्वर मित्र मंडळाच्या मानाच्या गणपतीपेक्षा कोणीही मोठा नसतो. आपण सर्वजण ज्या देवाला पूजनीय मानतो, त्या देवाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो. देवाच्या दृष्टीने सर्वजण समान असतात,’ असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली. आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह सोमेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, मानाच्या गणेश मंडळांमध्ये समावेश असलेल्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाने १३१ वर्षांची परंपरा अखंडपणे जपली आहे. कोणतेही शुभकार्य सुरू करताना प्रथम गणेशाची आराधना केली जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी सर्वत्र भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता मानून त्याची पूजाअर्चा करतो. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत प्रत्येकाला संधी मिळत असते. मात्र, मिळालेल्या संधीचे सोने करून पुढे कसे जायचे, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.
सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिके हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटाच्या काळातही राज्यातील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आपण १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे. मागील वर्षीचा ओला दुष्काळ आणि यंदाचा कोरडा दुष्काळही अनुभवत आहोत. राज्यावर आलेले अल निनोचे संकटही दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.निसर्गाचा हा चमत्कार असून, गणरायाच्या चरणी सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवण्याची, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करण्याची तसेच भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होण्याची प्रार्थना केल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक ठिकाणी आरती करण्यासाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आले होते. गणेशभक्तांनी दिलेल्या प्रेमामुळे आपण अक्षरशः थकून गेलो, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींसाठी आपण कायमच सर्वांच्या सोबत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा इच्छापूर्ती गणेशाची प्रतिमा देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळांनीही फिरवली काठी!
सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दांडपट्टा, लाठीकाठी आणि चक्री फिरवण्यासारख्या पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या खेळांनी उपस्थित गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनाही काठी फिरवण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही हातात काठी घेत ती गरगर फिरवली. आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नीने काठी फिरवण्याचा आनंद घेतल्याचे पाहून उपस्थित गणेशभक्त आश्चर्यचकित झाले.