औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून अहिल्यानगर जिल्हा ओळखला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात येणारी गुंतवणूक लक्षात घेऊन येणाऱ्या उद्योगांनाही मदत करण्याच्या दृष्टीने प्रवरा बँकेने तयारी ठेवावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरा सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, प्रवरा फळे-भाजीपाला सोसायटीचे चेअरमन मकरंद गुणे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, शांतीनाथ आहेर, रमेश शेठ पन्हाळे, राजेंद्र चोरमुंगे, सहकारी संस्थांचे सहनिबंधक नामदेव ठोंबळ, बँकेचे मॅनेजर सौरभ बालोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा आता औद्योगिक विकासाचे मुख्य केंद्र बनत असून, जिल्ह्यामध्ये शिर्डीसह हरेगाव, बेलवंडी, अहिल्यानगर आणि राहुरी येथेसुद्धा आता औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. या उद्योगांशी आपण कसे जोडले जाऊ, याचा विचार प्रवरा सहकारी बँकेने निश्चित करावा अशी अपेक्षा व्यक्त करून, उद्योजक आणि बँक यांच्यातील नात्यामुळेच जिल्ह्यात रोजगार निर्मितीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.
बँकेने मागील आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. ५ हजार रुपयांच्या ठेवींवरून बँकेचा सुरू झालेला प्रवास आता १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे. ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्वासाचे हे प्रतीक असून, सुमारे १८०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा पूर्ण केलेला टप्पा हा नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि कर्जदार यांच्या मागणीप्रमाणे कर्जाची गरज पूर्ण करण्याचे काम बँकेच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
सहकारी बँकांचा प्रवास हा नागरी बँकांकडून शेड्युल्ड बँकेकडे होत आहे. बँकांना आता मूलभूत बदलांना सामोरे जावे लागत असून, प्राथमिक सोसायट्यांबरोबरच सहकारी बँकांच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेले धोरण हे निश्चितच पाठबळ देणारे आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीमुळे सहकारी बँकांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मार्गक्रमण करणे सोपे झाले आहे. डिजिटल बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांनाही आता योग्य सुविधा मिळत असून, या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होत असलेले आर्थिक घोटाळे ही सध्याच्या काळात चिंताजनक बाब झाली आहे. अशा सर्व परिस्थितीतही प्रवरा सहकारी बँकेने अतिशय पारदर्शकपणे केलेल्या चांगल्या कारभारामुळेच सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य टक्के एनपीए’ राखण्यात संचालक मंडळाला यश आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तसेच बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
“प्रवरा सहकारी बँकेने सलग तिसऱ्या वर्षी ‘शून्य टक्के एनपीए’ राखण्यात मोठे यश मिळविले आहे. ठेवीदार आणि कर्जदार यांच्या भक्कम विश्वासामुळेच बँकेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, यंदाच्या वर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.”