ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली : रणजितसिंह देशमुख 

आश्वी । झुंझार न्यूज

राजहंस दूध संघाचे कार्यकुशल व लोकप्रिय चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अंभोरे येथील मल्हारराव होळकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरे या दोन्ही शैक्षणिक संकुलांना सदिच्छा भेट दिली. 

यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी मल्हारराव होळकर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या शैक्षणिक कार्याचा आणि भौतिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. विद्यालयातील सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, संगणक कक्ष, ई-लर्निंग डिजिटल वर्गखोल्या आणि प्रशस्त क्रीडांगणाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धा परीक्षेभिमुख शिक्षण देण्यासाठी विद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.


यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की, शिक्षणानेच ग्रामीण भागाचा आणि कष्टकरी शेतकरी कुटुंबांचा सर्वांगीण कायापालट होऊ शकतो. दुग्ध व्यवसाय व कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागातील नव्या पिढीला उच्च व तांत्रिक शिक्षण मिळणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, प्रामाणिक कष्ट आणि चिकाटीच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करावीत. शैक्षणिक विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राजहंस दूध संघ सदैव सहकार्य करेल.

तर प्राथमिक शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांशी त्यांनी अत्यंत आपुलकीने व जिव्हाळ्याने संवाद साधला. विद्यार्थ्यांचे वाचन, हस्ताक्षर, गणिती पाढे आणि सामान्य ज्ञान याविषयी माहिती जाणून घेतली. लहानग्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी हसतमुखाने उत्तरे दिली. प्राथमिक स्तरावर उत्कृष्ट शैक्षणिक पाया रचणाऱ्या जि.प. शाळेच्या शिक्षकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *