आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संगमनेर कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यालयाच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी धावण्याच्या विविध प्रकारांत सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यालयाचा विद्यार्थी रुद्र गणेश खेडकर याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले. तसेच प्रतिक लिंबाजी हजारे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक गणेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, योग्य प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली क्रीडाविषयक आवड यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष विनायकराव थोरात , मुख्याध्यापक पोपट सोनवणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यातही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करून विद्यालयाचे तसेच पानोडी गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सोनवणे यांनी दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *