संगमनेर । झुंझार न्यूज
युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा युवक महोत्सवची गरज आहे. आजचा युवक हा केवळ नोकरी मागणारा न राहता त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, त्यासाठी युवक महोत्सव हे एक चांगले माध्यम आहे. आजचा युवक हा देशाच्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून, त्याने केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्याच्यामधे असणाऱ्या कलांच्या माध्यमातून आपला विकास करण्याचा प्रयत्न करावा आजच्या या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ बक्षीसाचा विचार न करता विविध कला प्रकारांचा आनंद घ्यावा असे मत माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सव ‘जल्लोष २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
![]()
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सविता कुलकर्णी, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. संदीप पालवे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स.ब. वि.प्र.समाज संस्थेचे संचालक, प्रा. बाबा खरात, जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, सांस्कृतिक समन्वयक प्रा. नानासाहेब गुंजाळ, महाविद्यालय प्रशासन अधिकारी, श्री. गोरक्षनाथ पानसरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पालवे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देते. जल्लोष सारख्या महोत्सवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली कला सिद्ध करण्याची संधी मिळत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध २८ कलाप्रकार साध्य करण्यासाठी ही चांगली संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, आजचा सांस्कृतिक मंच केवळ स्पर्धेचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि आत्मविश्वास मिळतो, जो आयुष्याला उभारी देण्याचे काम करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे जे कला गुण आहेत त्यांचा आविष्कार त्यांनी या मंचावर सादर असे आव्हान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. जयराम डेरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामदास अहिराणी केले तर प्रा. नानासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले. या उद्घाटन प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १२०० विध्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 6
