५०० हून अधिक युवकांचा सहभाग ; २७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी
संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए), संगमनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत विशेष रोजगार महाकुंभ मेळावा उत्साहात संपन्न झाला. मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विविध महाविद्यालयांतील ५०० पेक्षा अधिक युवकांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २७ कंपन्यांनी सहभाग घेऊन युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या.
युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून युवकांना रोजगाराच्या संधींची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
या रोजगार महाकुंभामध्ये विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींचा समावेश करण्यात आला. आयटीआय व कौशल्याधारित व्यवसाय, अभियांत्रिकी व तांत्रिक पदे, एमबीए क्षेत्रातील मार्केटिंग, फायनान्स, एचआर, ऑपरेशन्स व बिझनेस ॲनालिटिक्स, फार्मसी व हेल्थकेअर, सेल्स व बिझनेस डेव्हलपमेंट, प्रशासन व सपोर्ट फंक्शन्स, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, मॅनेजमेंट ट्रेनी तसेच प्रवेशस्तरावरील आणि अनुभवी उमेदवारांसाठीच्या पदांचा समावेश होता.
उद्योगांकडून उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या संधी योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचवून ‘Industry Requirement – Right Talent – Right Skill – Right Opportunity – Employment – Career’ या संकल्पनेनुसार रोजगाराची साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. उद्योगांकडून उपलब्ध होणारी प्रत्येक रोजगाराची संधी युवकाच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकते, या उद्देशाने उद्योगांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तंत्र तसेच करिअर मार्गदर्शन यावर सातत्याने भर दिला जातो. बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार महाकुंभामध्ये उद्योग, एमएसएमई, कॉर्पोरेट कंपन्या, भरती संस्था, प्लेसमेंट एजन्सी, स्टार्टअप्स आणि उद्योजक सहभागी झाले. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले.
या रोजगार महाकुंभामुळे संगमनेर परिसरातील तसेच विविध भागांतून आलेल्या युवकांना उद्योगविश्वाशी थेट संवाद साधण्याची, रोजगाराच्या उपलब्ध संधी जाणून घेण्याची आणि आपल्या कौशल्यांनुसार करिअरची दिशा निश्चित करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अमृतवाहिनी एमबीए कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेला हा रोजगार महाकुंभ युवक आणि उद्योग यांच्यातील समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
या रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयू देशमुख, साखर कारखान्याचे संचालक माननीय इंद्रजित भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे तसेच व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी अमृतवाहिनी एमबीए इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे, प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. आर. बी. गवळी, प्रा. विजय थोरात तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
२७ कंपन्यांचा सहभाग
मेळाव्यात कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, एसबीआय कार्ड, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, महिंद्रा ग्रुप, ऊर्जा फूड्स अँड अॅग्रो प्रा. लि., ओरिओल फार्मा प्रा. लि., सह्याद्री अॅग्रोकेट, एसएलएनपी टॅक्स अँड टॅक्स अॅडव्हायझर्स प्रा. लि., राजहंस मिल्क, एसएमबीटी हॉस्पिटल, नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअर, चैतन्य इन्क्लुसिव्ह सर्किट्स प्लेसमेंट्स यांसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या व संस्थांनी सहभाग घेतला.