एक्स्पोतून लोकल ते ग्लोबलचा संदेश देत विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे प्रवास
झरेकाठी । झुंझार न्यूज
संजीवनी उद्योग समूहाचे विश्वस्त सुमित कोल्हे व निकिता कोल्हे यांनी एक्स्पोला भेट देत प्रवरेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असून शिक्षणासाठी अहिल्यानगरचे नवे मॉडेल उभारण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा आशावाद सुमित कोल्हे व निकिता कोल्हे यांनी व्यक्त केला.
लोकल ते ग्लोबल, टाकाऊपासून टिकाऊ, चला स्वदेशी वस्तूंचा वापर करूया, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, पारंपरिक उर्जेचा वापर आणि आरोग्यासाठी आयुर्वेदाकडे वळूया अशा विविध संदेशांची प्रभावी मांडणी करत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथे शुक्रवारपासून बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी एक्स्पो सुरू आहे. विद्यार्थ्यांसह पालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत विविध स्टॉलला भेट दिली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कल्पकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते उत्कृष्ट उद्योजक होऊ शकतात, हे बिल्डिंग प्रवराच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत सिद्ध होत आहे. ग्रामीण भारतातून विकसित भारताकडे वाटचाल घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून उद्योजकतेचे धडे मिळत आहेत.
विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवसायाची निवड करून त्यासाठी स्टॉल उभारले आहेत. उत्पादनाची निर्मिती, किंमत ठरविणे, ग्राहकांशी संवाद, मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, आकर्षक योजना आणि विक्री तंत्र यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे. व्यवसायातील संधी, संभाव्य धोके आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचीही त्यांना प्रत्यक्ष जाणीव होत आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुसऱ्या दिवशी बिल्डिंग प्रवरा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यवसायाचे नियोजन, मार्केटिंग, येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील विस्ताराबाबत त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या स्टॉलमधून खरेदी करत विविध खाद्यपदार्थाचाही आस्वाद घेतला.
आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. शासनासोबतच प्रवरा संस्थाही आवश्यक ते सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी स्टॉल उभारणीपासून सोशल मीडियावरील मार्केटिंग, सहप्रायोजक मिळविणे आणि प्रत्यक्ष विक्रीपर्यंतची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आपणही यशस्वी उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे. रविवारपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.