पुणे येथे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारच्या हेतू बद्दल शंका व्यक्त
पुणे । झुंझार न्यूज
पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देशात गेले आहे. देशातील हजारो युवक यामध्ये सहभागी होणार आहेत. पेपर फुटतात कसे, आंदोलनाची वेळ का येते असा सवाल करताना या सरकारच्या हेतू बद्दल शंका असून पेपर फुटी मागचा आका कोण हे तपासा व त्याला पकडा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते व माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पुणे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम शिवराज मोरे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विद्यार्थ्यांनाही आंदोलन करण्याची वेळ का येते, पेपर फुटतात कसे हा मोठा प्रश्न असून या सरकारच्या हेतू बद्दल मोठी शंका आहे. गोरगरिबांची ,सर्वसामान्यांची मुले लहानपणापासून अभ्यास करतात. आई वडील काबाडकष्ट करतात. एक वेळ अशी येते की, आपल्या मुलांनी मोठे व्हावे .कर्तबगारी दाखवावी. ही मुले रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अचानक पेपर फुटतो. सर्व भ्रमनिरास होतो.
हे पेपर फुटतात कसे, त्यांचा आका कोण आहे .ते तपासा त्याला पहिले पकडा अशी मागणी करताना ठराविक लोकांकरता भ्रष्टाचारी मार्गाने पेपर फोडले जातात. यामुळे गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय होतो. जे मुले रात्रंदिवस अभ्यास करतात. ते नापास होतात आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांची मुले पास होतात.
पोलीस भरतीमध्ये काही संशय निर्माण झाल्याने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी पोलीस भरतीमध्ये अत्यंत शिस्त लावली. जी आजपर्यंत सुरू आहे. त्यामध्येही आता या सरकारच्या काळात गडबड होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये 70,000 जागा रिकाम्या आहेत. कृषी विद्यापीठांमध्ये 70 टक्के जागा रिकाम्या असून अवघे 30 टक्के लोक काम करत आहे. हे विद्यार्थी राज्याचे आणि देशाचे भांडवल आहे. युवा ताकद देशाच्या भवितव्यासाठी वापरणार कधी असा सवाल करताना परीक्षेनंतर तीन-तीन वर्ष निकाल लागत नाही भ्रष्टाचार होतो. अत्यंत दुर्दैवाचे आहे
विविध शाळा महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये 30 च टक्के शिक्षक आहेत. मग पुढची पिढी चांगली घडणार कशी. गरिबांची मुले पुढे जाणार कशी. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले हा कायद्याचा प्रश्न आहे. पण त्याही पुढे जाऊन नैतिकता म्हणून काही आहे का नाही असा सवाल करताना भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिकतेने रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
या सरकारने तर शंभर वेळा राजीनामा दिला पाहिजे. खरे तर हे सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही. त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली
देशामध्ये लोकशाही राज्यघटना राहणार की नाही हे युवकांनी ठरवले पाहिजे. महाराष्ट्राने कायम देशाला जागे केले आहे. पुन्हा एकदा देश घडवण्याची ताकद महाराष्ट्राच्या युवकांमध्ये आहे. पुन्हा एक स्वातंत्र्य चळवळ उभी करण्यासाठी हे युवक निघालेले आहेत .चुकीचे जे आहे ते दुरुस्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना सांगितले असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्याचे वरिष्ठ नेते मा. महसूल बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थी आंदोलनाला दिलेल्या पाठिंबामुळे उपस्थित राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.