संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात सरदार थोरात यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि आदराच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात विविध सामाजिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे स्कूल कमिटी अध्यक्ष विनायकराव थोरात आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यभान थोरात यांच्या हस्ते सरदार शिवराव थोरात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विनायकराव थोरात म्हणाले की, “सरदार शिवराव थोरात हे अतिशय करारी स्वभावाचे आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांना मिळालेल्या जहागिरीचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी न करता गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी केला. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून त्यांनी जनसेवेचे मोठे कार्य उभे केले.” पुढे ते म्हणाले की, “अहमदनगर लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते, जे त्यांच्या पुरोगामी विचारांची साक्ष देतात.
या पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, चमचा-लिंबू आणि रस्सीखेच यांसारख्या खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी मुख्याध्यापक सोनवणे पी.व्ही., वाणी के.पी., घाडगे व्ही.बी., जाधव जी.पी., लावरे आर.बी., घोगरे एस.के., मुन्तोडे एस.एस., गांगुर्डे एस.के., साबळे एल.के. आणि पाबळ बी.बी. यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.