एकाच ट्रान्सफॉर्मर परिसरात पुन्हा आग; पंचनामा करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी
झरेकाठी । झुंझार न्यूज
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे बुधवारी (दि. २१) दुपारी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे १५ ते २० एकरांवरील ऊस जळून खाक झाला. वर्षभर कष्ट करून उभे केलेले ऊस पीक काही क्षणांत आगीत भस्मसात झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडगाव शिवारात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मुळे दुपारी अचानक ठिणगी पडून उसाला आग लागली. वारा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे क्षेत्र जळून गेले होते.
जळालेल्या क्षेत्राचे अधिकृत मोजमाप अद्याप झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार १५ ते २० एकरांहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याची शक्यता आहे. या आगीत भागचंद आण्णासाहेब आसने, बाळासाहेब दत्तात्रय आदिक, द्वारकाबाई बाळासाहेब आदिक, आदिनाथ आसने, विजय दत्तात्रय आदिक, निर्मला विजय आदिक, सुनील गोरक्षनाथ आसने, नितीन गोरक्षनाथ आसने या शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
माळवाडगावातील संबंधित ट्रान्सफॉर्मर परिसरात यापूर्वीही उसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा केवळ अपघात नसून वीज यंत्रणेतील बिघाड असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने या वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून दोष दूर करावेत, अन्यथा भविष्यात आणखी मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खाली लोंबकळत असल्याने संभाव्य अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी वाहनांनाही या तारांचा स्पर्श होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.