{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

लोकसहभागातून पाझर तलावाची निर्मिती; श्रमदानातून पाणीटंचाईवर मात करण्याचा आदर्श उपक्रम

झरेकाठी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावाने लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर पाणीटंचाईवर मात करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या गावाने ग्रामस्थांच्या एकजुटीतून पाझर तलावाची निर्मिती केली. या जलसंधारणाच्या कामामुळे सावरगाव घुलेसह टाळूचीवाडी, आमलेवाडी आणि बेलसोंडा परिसरात टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली आहे. लोकसहभागातून जलसंधारण साध्य करून पाणीटंचाईवर मात करण्याचा हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पाणीटंचाई निर्माण झाली की टँकरची प्रतीक्षा करायची, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकायचे आणि उन्हाळ्यात पाण्याअभावी स्थलांतराची वेळ सहन करायची, अशी परिस्थिती सावरगाव घुले येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षे अनुभवली. उंच पठारी, पर्जन्यछायेच्या आणि अवर्षणप्रवण भागात असलेल्या या गावात तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणीटंचाई तीव्र होत असे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. काही कुटुंबांनाही पाण्याच्या अभावामुळे स्थलांतराचा सामना करावा लागत होता.

केवळ टँकरवर अवलंबून राहून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, याची जाणीव ग्रामस्थांना झाली. त्यातून पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाण्याची मुरवण वाढविणे आणि भूजलसाठ्याचे पुनर्भरण करणे, या उद्देशाने जलसंधारणाची कामे करण्याचा निर्धार करण्यात आला.

सरपंच नामदेव घुले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत सन २०२३ ते २०२५ या कालावधीत लोकसहभागातून पाझर तलावाचे काम पूर्ण केले. या उपक्रमात गावातील पुरुष, महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रमदान, सामूहिक प्रयत्न आणि पाणीप्रश्न सोडविण्याची जिद्द यांच्या जोरावर हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला.

या कामासाठी राजू घुले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बाबासाहेब कडू, मच्छिंद्र घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, नितीन घुले, किरण घुले यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थांनी योगदान दिले. गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट ही या उपक्रमाची खरी ताकद ठरली.

या जलसंधारणाच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कडू यांच्याकडून माहिती घेण्यात आली. लोकसहभागातून उभारलेल्या या उपक्रमामुळे पाण्याची उपलब्धता वाढविण्यास आणि भूजल पुनर्भरणाला हातभार लागण्यास मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाझर तलावाच्या निर्मितीमुळे सावरगाव घुलेसह टाळूचीवाडी, आमलेवाडी आणि बेलसोंडा परिसरात पाणीटंचाईच्या समस्येवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. टँकरची गरज कमी होण्यास मदत झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाण्यासाठी शासनाच्या मदतीची वाट पाहण्याबरोबरच स्वतःच्या सामूहिक प्रयत्नांतूनही कायमस्वरूपी उपाययोजना करता येऊ शकतात, हे या गावाने दाखवून दिले आहे .

पाझर तलावाची निर्मिती हा पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा महत्त्वाचा टप्पा असला, तरी हा बदल कायम टिकविण्यासाठी पुढील काळातही प्रयत्नांची गरज आहे. तलावातील गाळ वेळोवेळी काढणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडविणे आणि नव्या जलसंधारणाच्या कामांना सातत्य देणे आवश्यक आहे.

लोकसहभाग, श्रमदान आणि जलसंधारणाच्या बळावर सावरगाव घुलेने उभा केलेला हा आदर्श इतर दुष्काळग्रस्त गावांसाठी दिशादर्शक ठरू शकतो. पाणी वाचविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी एकजुटीने प्रत्यक्षात आणला, तर पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे, हा संदेश या उपक्रमातून मिळतो

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *