संगमनेर । झुंझार न्यूज
आईच्या हातच्या जेवणात केवळ चव नसते, तर तिच्या मायेचा, प्रेमाचा आणि वात्सल्याचा अमृतस्पर्श असतो. याच मायेची ऊब आता गरजू, कष्टकरी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाही अवघ्या ४० रुपयांत अनुभवता येणार आहे. भुकेल्या पोटाला अन्न, थकलेल्या जीवाला आधार आणि माणुसकीला सेवाभावाची नवी दिशा देणाऱ्या ‘सफायर माझी आई अन्नछत्र’ या कायमस्वरूपी प्रकल्पाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी संगमनेर येथे झाला. लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरने सुरू केलेला हा उपक्रम म्हणजे केवळ अन्नदान नव्हे, तर ‘कोणीही उपाशी राहू नये’ या संवेदनशील विचाराला कृतीत उतरवणारा माणुसकीचा महायज्ञ ठरणार आहे. 40 रूपयांमध्ये दोन भाज्या, वरण, भात, चपाती, लोणचे, चटणी अशी परिपूर्ण थाळी मिळणार आहे.
लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरतर्फे सोमाणी मंगल कार्यालय येथे या प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात करण्यात आले. शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व एशियन योगासनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, सेकंड व्हाइस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सुनीताजी मालपाणी आणि माहेश्वरी पंच ट्रस्टचे सेक्रेटरी श्रीकांतजी कासट यांच्या हस्ते या सेवाकार्याचा प्रारंभ झाला.

या सोहळ्याला प्रकल्पाचे संकल्पक व लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष जितेश लोढा, सेक्रेटरी नम्रता अभंग, खजिनदार चंद्रशेखर गाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि क्लबचे सदस्य उपस्थित होते.

‘सफायर माझी आई अन्नछत्र’ या प्रकल्पाच्या माध्यमातून गिरीश मालपाणी यांनी याच बांधिलकीचे दर्शन घडवले. या प्रकल्पासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. उद्योजक प्रफुल्ल बोगावत यांनी दरमहा 5000 रूपयांची देणगी जाहिर केली आहे. त्याचबरोबर गिरीश मालपाणी, सुनीताजी मालपाणी, उमेश कासट, सागर मणियार, सुमित अट्टल, कल्याण कासट, सुमित मणियार, पवन करवा, अतुल अभंग, राजश्री भंडारी, संगिता पुंड यांनी दरमहा प्रत्येकी 1000 रूपये या प्रकल्पासाठी कायमस्वरूपी देण्याचा संकल्प केला. या देणगीदारांनी आपले धनादेश क्लबकडे सुपूर्द करून सेवाकार्याच्या सातत्यासाठी पुढाकार घेतला.

प्रकल्पाची माहिती देताना अध्यक्ष जितेश लोढा यांनी सांगितले की, गरजू नागरिक, कर्मचारी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांना अवघ्या ४० रुपयांत जेवण उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि समाजोपयोगी संकल्पना आहे. गिरीश मालपाणी यांनी ही संकल्पना केवळ चर्चेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात आणली, याचा आपल्याला अभिमान असल्याचे लोढा यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी सोमाणी मंगल कार्यालयाची वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल माहेश्वरी पंच ट्रस्टच्या वतीने श्रीकांत कासट यांनी समाधान व्यक्त केले. पवित्र आणि समाजोपयोगी कार्यासाठी आपल्या संस्थेच्या वास्तूचा उपयोग होत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनीताजी मालपाणी यांनी आपल्या मनोगतातून ‘माझी आई’ या नावामागील भावार्थ उलगडला. आईच्या हातच्या अन्नातील ममता आणि आपुलकी प्रत्येकाला भावनिक आधार देणारी असते, असे सांगत त्यांनी साईबाबांच्या अन्नदान परंपरेची आठवण करून दिली. साईबाबांनी एका हंडीत संपूर्ण गावासाठी अन्न तयार करून त्याचे वाटप केले. त्या परंपरेतून सामूहिकतेचा, समानतेचा आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. विजयादशमीच्या शुभदिनी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरने अशाच विचारातून अन्नछत्र सुरू केले, ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पाचे संकल्पक गिरीश मालपाणी यांनी अन्नछत्राच्या आर्थिक बाजूविषयी उपस्थितांना माहिती दिली. अवघ्या ४० रुपयांत जेवण उपलब्ध करून देत असलो, तरी प्रत्यक्ष भोजनव्यवस्थेचा खर्च मोठ्या प्रमाणावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. साईबाबांच्या हंडीमध्ये गावातील प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार अन्न टाकत असे आणि त्या सामूहिक योगदानातून अनेकांची भूक भागत असे. त्याच भावनेतून प्रत्येकाने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार देणगी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित यांनी संगमनेर सॅफ्रॉन क्लबच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. क्लबने एखादा कायमस्वरूपी समाजोपयोगी प्रकल्प हाती घ्यावा, अशी अपेक्षा आपण गिरीश मालपाणी यांच्याकडे व्यक्त केली होती. आपल्या कार्यकाळातच त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला, याचा विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ एखादा कार्यक्रम आयोजित करणे आणि एखादे सेवाकार्य सातत्याने चालवणे, यात मोठा फरक असतो. कायमस्वरूपी प्रकल्पासाठी नियोजन, आर्थिक पाठबळ, समर्पित कार्यकर्ते आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. ‘सफायर माझी आई अन्नछत्र’ या प्रकल्पाच्या माध्यमातून क्लबने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भविष्यातही संगमनेर सॅफ्रॉन सफायरने अशा अनेक कायमस्वरूपी प्रकल्पांची उभारणी करावी, अशा शुभेच्छा दीक्षित यांनी दिल्या.

प्रकल्पाचे उद्घाटक डॉ. संजय मालपाणी यांनी आपल्या मनोगतातून अन्नदानाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ आणि अतिथियज्ञ यांप्रमाणेच वैश्वयज्ञ म्हणजे समस्त जीवसृष्टीला अन्न-पाणी देण्याचा यज्ञ होय, असे त्यांनी सांगितले. लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरने अशा यज्ञाचा प्रारंभ केला, ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. गरजू नागरिकांना ४० रुपयांत जेवण देण्याबरोबरच भविष्यात गरजू शाळांच्या मध्यान्ह भोजनाची जबाबदारीही क्लबने स्वीकारावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या सेवाकार्याचा विस्तार होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल, असे त्यांनी सुचवले.

माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी या प्रकल्पाच्या उभारणीत उमेश कासट, कल्याण कासट, राजेश मालपाणी, अतुल अभंग आणि रोहित मणियार यांनी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले. कोणत्याही मोठ्या उपक्रमामागे अनेकांचे परिश्रम, वेळ आणि समर्पण असते. या सर्वांच्या सहभागातूनच प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास भंडारी यांनी केले, तर अतुल अभंग यांनी आभार मानले. या सोहळ्याला क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

‘सफायर माझी आई अन्नछत्र’ची चूल अखंड पेटती राहो, तिच्या प्रत्येक घासातून मायेचा सुगंध दरवळत राहो आणि समाजातील प्रत्येक दानशूर हात या सेवायज्ञात सहभागी होवो, हीच या मंगल प्रारंभानिमित्त सदिच्छा!
सेवाकार्यासाठी मालपाणी उद्योग समूहाची भक्कम साथ – डॉ. संजय मालपाणी
‘अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. ‘सफायर माझी आई अन्नछत्र’ची चूल अखंड पेटती राहण्यासाठी केव्हाही मालपाणी उद्योग समूहाची मदत लागली, तर आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी ग्वाही डॉ. संजय मालपाणी यांनी यावेळी दिली. गिरीश मालपाणी यांनी वैयक्तिक खात्यातून पाच लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. तसेच क्लबच्या काही सदस्यांनी दरमहा एक हजार रुपये, तर उद्योजक प्रफुल्ल बोगावत यांनी दरमहा पाच हजार रुपये देण्याचा संकल्प केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. अन्नदानाच्या कार्यातून गरजूंची भूक भागवण्याबरोबरच देणगीदारांच्या जीवनातही समृद्धी आणि भरभराट येते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
