अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 


अहिल्यानगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात शेळ्यांची चोरी करून हैदोस घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकूण १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. याच दरम्यान केडगाव बायपास परिसरात काही संशयित लोक चोरीच्या शेळ्या घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी केडगाव बायपास येथे सापळा रचला. एका टाटा सुमो गोल्ड वाहनाची तपासणी केली असता, त्यात तीन शेळ्या आणि एक बोकड आढळून आला. वाहनातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.


पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपले गुन्हे मान्य केले. ही टोळी अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात सक्रिय होती. तपासादरम्यान या टोळीने आतापर्यंत शेळी चोरीचे एकूण १२ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.


तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ही टोळी चोरलेल्या शेळ्या पुण्यातील काही मटन विक्रेत्यांना विकत असे. पोलिसांनी एका मटन विक्रेत्याकडून शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेले ५० हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात आणखी चार मटन विक्रेते फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या शेळ्या, गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो गाडी आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहे. या टोळीला अटक केल्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.