१२ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त; ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटा वापरून करायचे फसवणूक
संगमनेर । झुंझार न्यूज
खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनता नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली असून, यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने दोन लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष एका व्यक्तीला दाखवले होते. फसवणूक करण्यासाठी ही टोळी अत्यंत हुशार पद्धतीचा वापर करत होती. नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर केला जात असे. अशा प्रकारे नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना लुटण्याचे काम ही टोळी करत होती.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव), उमेश कांबळे (रा. खामगाव), संदीप धडमवार (रा. नाशिक) आणि गोलू उर्फ शंकर गिरी (रा. शेगाव) या चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालील साहित्य जप्त केले आहे:
-
रोख रक्कम: १ लाख ८५ हजार रुपये.
-
बनावट नोटा: १४ लाख रुपये दर्शनी मूल्याचे खेळण्यातील नोटांचे बंडल्स.
-
वाहन: १० लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार (MH 56 A 4423).
-
इतर: तीन मोबाईल फोन आणि इतर साहित्य.
असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.