दुष्काळावर मात करत पाण्यावर केला लाखो रुपयांचा खर्च; पिंपळे येथील रमेश ढोणे यांचा प्रेरणादायी संघर्ष
झरेकाठी । झुंझार न्यूज
“जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते,” हे संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावच्या एका ध्येयवेड्या युवकाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. दगडधोंड्यांनी व्यापलेल्या खडकाळ माळरानावर हिरवीगार डाळिंबाची बाग फुलवून, रमेश मनोहर ढोणे पाटील या तरुणाने आज अनेक शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

एकेकाळी चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या रमेश ढोणे यांनी शेतीत काहीतरी वेगळे करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांची वडिलोपार्जित जमीन पूर्णपणे खडकाळ, उंच-सखल आणि शेतीसाठी अयोग्य मानली जात होती. अशा जमिनीत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक जोखीम होती. मात्र, रमेश यांनी हार न मानता सर्वप्रथम जमिनीचे सपाटीकरण केले. त्यानंतर बाहेरील सुपीक माती विकत आणून जमिनीचा पोत सुधारला आणि या कठीण भूभागाला शेतीसाठी योग्य बनवले.

लाखो रुपयांचे पाणी अन् टँकरचा आधार
या प्रवासात सर्वात मोठे संकट होते ते पाण्याचे. पिंपळे परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे बाग जगवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, रमेश ढोणे यांनी बागेला मुलाप्रमाणे जपले. भीषण टंचाईत त्यांनी मागे-पुढे न पाहता शेकडो पाण्याचे टँकर विकत घेतले. केवळ बाग जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. अनेक वेळा आर्थिक अडथळे आले, पण त्यांनी डाळिंबाची झाडे कोमेजू दिली नाहीत.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
या खडतर प्रवासात रमेश यांना प्रगतशील शेतकरी माऊली कोटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, ‘ॲग्रीक्रॉस’चे राऊत यांनी तांत्रिक बाजू सांभाळत खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि दर्जेदार उत्पादनवाढीसाठी वेळोवेळी सल्ला दिला. तज्ज्ञांच्या या मार्गदर्शनामुळेच खडकाळ जमिनीत डाळिंबाचा प्रयोग यशस्वी झाला.

१५ ते २० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
आज दोन एकर क्षेत्रावर पसरलेली ही डाळिंब बाग लाल, टपोऱ्या आणि दर्जेदार फळांनी बहरली आहे. बाजारपेठेत या फळांना मोठी मागणी असून, व्यापाऱ्यांनी थेट बागेत येऊन खरेदीसाठी उत्सुकता दाखवली आहे. या बागेतून यंदा १५ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पिंपळे परिसरातील खडकाळ जमिनीत डाळिंब लागवडीचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याने, परिसरातील शेतकरी आणि कृषी अधिकारी या बागेला भेटी देत आहेत.

नोकरीच्या मागे न धावता, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर शेतीतूनही प्रगती साधता येते, हे रमेश ढोणे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशोगाथेचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी ते प्रेरणेचा स्त्रोत ठरले आहेत.
Post Views: 109
