झरेकाठी । झुंझार न्यूज
रात्रीची पावणे बाराची वेळ… चहुबाजूला पसरलेला काळोख आणि पावसाने उडालेला चिखलाचा खडतर रस्ता. अशा परिस्थितीतही आपल्या मतदाराच्या दुःखाला धावून जात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. बनावट औषध फवारणीमुळे उद्ध्वस्त झालेली डाळिंब बाग पाहून व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी आमदारांनी चक्क दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (मिल्क व्हॅन) आधार घेत थेट शेतकऱ्याचे घर गाठले. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून दोषी कृषी सेवा केंद्रावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सोमनाथ किसन गोडसे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रातील डाळिंब बागेवर एका कृषी सेवा केंद्रातून आणलेल्या रासायनिक औषधांची फवारणी केली होती. मात्र, ही औषधे बनावट असल्याने अवघ्या काही वेळातच संपूर्ण बाग जळून खाक झाली. वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांचे भांडवल डोळ्यादेखत मातीमोल झाले. या फवारणीमुळे गोडसे यांचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दूध वाहनातून ४ किमीचा खडतर प्रवास
आमदार अमोल खताळ हे पेमगिरी परिसरात एका सांत्वन भेटीसाठी आले होते. ही माहिती मिळताच शेतकरी सोमनाथ गोडसे यांनी त्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आणि बाग पाहण्याची विनंती केली. वेळ रात्रीची साडेअकराची होती, रस्ता इतका खराब होता की आमदारांची आलिशान गाडी तिथे जाऊ शकत नव्हती. मात्र, शेतकऱ्याची तळमळ पाहून आमदार खताळ यांनी विलंब न लावता तिथे उभ्या असलेल्या एका दूध वाहतूक करणाऱ्या वाहनात बसण्याचा निर्णय घेतला. सुमारे ४-५ किलोमीटरचा हा खडतर प्रवास करून ते मध्यरात्री शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले.
बागेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमदारांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. “ज्या कृषी सेवा केंद्र चालकाने बनावट औषधे देऊन शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्याची तातडीने चौकशी करा आणि त्या केंद्रावर कडक कायदेशीर कारवाई करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच नुकसानग्रस्त बागेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आमदार खताळ यांच्या या संवेदनशीलतेमुळे पेमगिरी परिसरात त्यांचे कौतुक होत असून, संकटकाळात लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
Post Views: 9


