शेवगाव । झुंझार न्यूज 


भविष्यातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि मतदार याद्यांमधील त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी राबविण्यात येणारी मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारी यंत्रणा आपले काम करत असली तरी, संघटनात्मक पातळीवर बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी यात मोठे योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघातील मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विनायक देशमुख यांच्यासह मोहिमेसाठी नियुक्त केलेले पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले.

१ लाख ७१ हजार अर्जांचे वाटप; कामाला गती देण्याचे निर्देश
ना. विखे पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत मतदार संघात १ लाख ७१ हजार अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. आता केवळ अर्ज वाटून चालणार नाही, तर ते भरून घेण्याच्या कामाला गती द्यावी लागेल. सरकारी यंत्रणा आपले काम करतच आहे, परंतु कार्यकर्त्यांनी यंत्रणेच्या एक पाऊल पुढे जाऊन सक्रिय व्हावे.

 

देशातील २२ राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती देऊन मंत्री विखे पाटील म्हणाले की, “या मोहिमेमुळे कोणत्याही खऱ्या मतदारावर अन्याय होणार नाही. उलट, दुबार नावे आणि खोटी माहिती देऊन मतदार यादीत घुसलेल्या व्यक्तींची नावे काढून टाकण्याची ही मोठी संधी आहे.”

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील उदाहरणाने कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. “पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे मोहीम राबविल्यामुळे ९१ लाख घुसखोर आणि बोगस मतदारांची नावे समोर आली. तेथील निवडणूक प्रक्रियेत वर्षानुवर्षे सुरू असलेली गुंडगिरी आणि अराजकता या मोहिमेमुळे संपुष्टात आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

२००२ पासूनच्या नोंदी महत्त्वाच्या


मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २००२ पासूनच्या नावाचा समावेश असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया तांत्रिक असली तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे. स्थानिक पातळीवर आपल्या गावात, प्रभागात आणि विशेषतः प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करून ही प्रक्रिया यशस्वी करण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


“ही मोहीम भविष्यात पुन्हा कधी होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आताच तिचे गांभीर्य ओळखा. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम तुम्हाला भविष्यात नक्कीच दिसेल,” असा विश्वास व्यक्त करत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना या मोहिमेत पूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन केले.

 

या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात मतदार नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *