ठराव सादर करण्याची मुदत संपली; राजकीय हालचालींना वेग, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणूक प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. निवडणुकीचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव सादर करण्याची मुदत गुरुवारी (१६ जुलै) सायंकाळी संपली. महिनाभर चाललेल्या या प्रक्रियेत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या असून, आता सर्वांचे लक्ष आगामी मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे.
१७ जूनपासून ठराव संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जिल्हा बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी प्रत्येक गटाने आपापल्या समर्थकांचे ठराव पदरात पाडून घेण्यासाठी मोठी ताकद लावली होती. ज्या व्यक्तींची नावे या ठरावात अंतिम झाली आहेत, त्यांनाच आता प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येणार आहे किंवा मतदान करता येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत प्रत्येक तालुक्यात छुपी युती आणि कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळाले.
या निवडणुकीत १ जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी बँकेचे सभासद असलेल्या संस्थाच मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत. सहकार विभागाने थकबाकीदार संस्थांबाबत कडक भूमिका घेतली आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था वगळता इतर संस्था थकबाकीत असल्यास त्यांच्या प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार नाकारला जाणार आहे. मात्र, सोसायटी थकबाकीत असली तरी, थकबाकीदार नसलेल्या सदस्याला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची सवलत देण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या ७३ क, अ (१) नुसार कारवाई झालेल्या संस्थांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
१४ जागा: जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील सेवा सोसायट्यांसाठी.
०२ जागा: महिला राखीव प्रवर्ग.
०३ जागा: अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि एनटी प्रवर्गासाठी प्रत्येकी एक.
०२ जागा: शेती पूरक आणि बिगर शेती मतदारसंघासाठी प्रत्येकी एक.
पुढील महिनाभरात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष मतदान होऊ शकते.
विखे विरुद्ध सर्वपक्षीय ‘समविचारी’ गट
या निवडणुकीत सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे ‘राजकीय मोर्चेबांधणीची’. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वपक्षीय ‘समविचारी’ नेते एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाने एकत्र येत विखे पाटील यांना जोरदार धक्का दिला होता. त्यावेळी २१ पैकी १७ ते १८ जागा जिंकत महाविकास आघाडी व समविचारी गटाने बँकेवर झेंडा फडकवला होता, तर विखे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाही विखे पाटील यांच्या विरोधात समविचारी गट तयार होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत जुन्या जाणत्या नेत्यांसोबतच अनेक ‘नवे चेहरे’ आणि राजकीय वारसदार नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
१. युवा नेत्यांची एन्ट्री: अनेक प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुलांच्या किंवा समर्थकांच्या नावे ठराव करून त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी केली आहे.
२. कोल्हे गट: विवेक कोल्हे यांची भूमिका या निवडणुकीतही निर्णायक ठरणार असून, त्यांच्या गटातून काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात.
३. विखे गट: मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पाटील आपल्या निष्ठावान आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची शक्यता असून यात डॉ सुजय विखे पाटील हे आघाडीवर असून कदाचित चेअरमन ची लॉटरी ?
४. तालुकानिहाय चुरस: संगमनेर, राहुरी, कोपरगाव आणि कर्जत-जामखेड या तालुक्यांमध्ये नव्या दमाच्या उमेदवारांची संख्या मोठी असून, सेवा सोसायट्यांच्या ठरावांमध्ये ही नावे अग्रक्रमाने दिसत आहेत.


