{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

गुरुपौर्णिमेनिमित्त ४१ क्विंटल बुंदी, ३५ क्विंटल चिवड्याचा महाप्रसादाचे वाटप. 

 

 हजारो भाविकांनी घेतले जनार्दन स्वामींचे दर्शन.

कोपरगाव । झुंझार न्यूज 

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आत्मज्ञानाचे दीपस्तंभ असून, विश्वातील सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार घडवून देणारेच खरे सद्गुरू होत. आपल्या परिसराला राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या रूपाने असे महान सद्गुरू लाभले, हे आपले परमभाग्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर त्यांच्या दिव्य चरित्राचे श्रवण, स्मरण आणि दर्शन केल्याने सद्गुरूंची कृपादृष्टी लाभते असेही ते म्हणाले.

     

     

कोपरगाव बेट भागातील दक्षिणगंगा गोदावरी काठी असलेल्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पहाटेपासूनच समाधीस्थळ परिसरात “जय जनार्दन स्वामी महाराज की जय,जय गुरुदेव”च्या घोषणांनी आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या समाधीची महापूजा, नित्यनियम, वेदघोष, सत्संग व प्रवचनांचा कार्यक्रम पार पडला.पूजेचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न प्रशांत शिखरे (त्र्यंबकेश्वर), अनंत शास्त्री लावर (राहाता) तसेच महादेव मंदिराचे पुजारी जयप्रकाश पांडे यांनी केले.

             

प्रारंभी आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची व भावी उपक्रमांची माहिती दिली.

         

 गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त माधवगिरी महाराज, शिवगिरी महाराज, संदीपगिरी महाराज, महेशगिरी महाराज आणि भोलेगिरी महाराज यांनी उपस्थित राहून सद्गुरूंना अभिवादन केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध दिंड्या बेट येथे दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

जनार्दन स्वामी समर्थ मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते, तर समाधीस्थळावर विविधरंगी फुलांची नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच सद्गुरूंच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी दक्षिणगंगा गोदावरी नदीत पवित्र स्नान करून गुरुपौर्णिमेची पर्वणी साधली.

             

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबकभाऊ पाटील यांनी केले, तर उपाध्यक्ष विलास कोते यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थान तसेच श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट, बेटचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, उपस्थित भाविकांना चिवडा आणि बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात आला. 

४१ क्विंटल बुंदी आणि ३५ क्विंटल चिवडा महाप्रसाद

 

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आश्रमाच्या वतीने यावर्षी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भाविकांसाठी तब्बल ४१ क्विंटल बुंदी आणि ३५ क्विंटल चिवडा महाप्रसाद म्हणून तयार करण्यात आला. सकाळपासूनच प्रत्येकी ४० हजार बुंदी व चिवड्याची पाकिटे भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने जागेवर वाटण्यात आली. महाप्रसाद वितरणाची व्यवस्था शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *