भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा कालव्यांच्या दुरुस्ती कामांचे सात्रळ येथे भूमिपूजन; १५० कोटींचा निधी उपलब्ध

झरेकाठी । झुंझार न्यूज

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महायुती सरकारने सुरू केलेला ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’ राज्याच्या जल व्यवस्थापनात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भंडारदरा प्रकल्पाच्या सात्रळ परिसरातील प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती कामांचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “राज्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, जुन्या झालेल्या कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते, परिणामी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी येतात. ही गळती रोखण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चारी, पोटचारी तसेच कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून ‘कमी पाण्यात अधिक उत्पादन’ घेण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.”


सरकारच्या शेतकरी कल्याणकारी योजनांचा पाढा वाचताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजच या कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झाला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. तसेच वीजबिलाची थकीत रक्कम माफ करून सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे.


विखे पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुका संपल्यानंतर पक्ष संघटनेच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. “आपली संघटना मोठी आहे, कार्यकर्ता एकदा कामाला लागला की तो थांबत नाही,” असे सांगतानाच त्यांनी स्व. शिवाजी कर्डिले आणि आ. अक्षय कर्डिले यांच्या निवडणुकीतील मताधिक्याचा संदर्भ दिला. तसेच, सात्रळ परिसरासाठी २५ कोटी रुपयांचे रस्ते मंजूर झाल्याचे जाहीर केले. मात्र, वाळू आणि मुरुमाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात आणि नंतर तेच लोक उपोषणाला बसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.


आमदार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वांबोरी चारी, निळवंडे यांसारख्या अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती मिळाली आहे. कालव्यांच्या दुरुस्तीमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.


अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी, सिंचन सुधारणा कार्यक्रमामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता काळे , कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अभियंता प्रमोद माने, गणेश हापसे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, माजी उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ॲड. आप्पासाहेब दिघे, विजय लगड, वसंतराव डुक्रे, सुरेशशेठ वाबळे, बाळासाहेब दिघे, बाळकृष्ण चोरमुंगे, सुभाष अंत्रे, मच्छिंद्र अंत्रे, दिलीपराव चोरमुंगे, अशोक गागरे, भीमराज हारदे, सोपान गागरे, बलराज पाटील, हिराबाई पाटोळे, पाराजी घनवट, रमेश पन्हाळे, संरपच अलकाताई दिघे, दत्ता पाटील यांच्यासह प्रवरा लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *