“नेहमी अन्यायाला गाडा असे म्हणत अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अशोक गायकवाड. आंबेडकरी चळवळीला आधार देण्यासाठी त्यांनी नेहमीच निर्भीड भूमिका घेतली. सम्राट अशोकांप्रमाणेच ते खऱ्या अर्थाने अहिल्यानगरचे सम्राट होते,” अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नेते तथा आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये स्व. अशोकराव गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (दि. ९) अहिल्यानगर येथील वृंदावन हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे होते.
समाजहितासाठी अहोरात्र झगडणारे नेतृत्व: राधाकृष्ण विखे पाटील
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अशोकराव गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे पाटील म्हणाले की, “स्व. अशोकराव हे समाजाशी कायम एकनिष्ठ होते. पदमविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ते एक अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व होते. समाजाच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि ते सोडवण्यासाठी ते अहोरात्र झगडताना दिसत. त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे.
‘पॅन्थर अशोकराव गायकवाड मार्ग’ नामकरणाचा प्रस्ताव या शोकसभेत नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. माऊली संकुल ते तोफखाना पोलीस चौकी या रस्त्याला ‘पॅन्थर अशोकराव गायकवाड मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्याबाबत ठराव करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच शहरात त्यांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
या शोकसभेला आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, रिपाइंचे ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव , भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ॲड. विवेकभाई चव्हाण, उपमहापौर धनंजय जाधव, ॲड. संघराज रुपवते, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुरेंद्रभाऊ थोरात , युवा नेते आशिष शेळके, अमित काळे, विलास खरात , विजय वाबळे, वाल्मिक भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, प्रा. निवृत्ती आरु, प्रा. विलास साठे, जल अभियंता परिमल निकम, अजय साळवे, विजयराव भांबळ, ॲड. वाल्मीक निकाळजे, संजय खामकर, शिवाजी साळवे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भीमराव पगारे, महेबूब सय्यद, प्रा. ना. म. साठे, नाथाभाऊ आल्हाट, ॲड. अभयाताई सोनवणे, किरण दाभाडे, गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड, प्रा. हनुमंत गायकवाड , सिध्दार्थ खरात आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. अनंत लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. जयंत गायकवाड यांनी केले. उपस्थितांनी अशोकराव गायकवाड यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.