१० दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे सरपंच व ग्रामसेवकांचे आश्वासन; एकलव्य संघटना आणि टायगर फोर्सचा पाठिंबा

आश्वी । झुंझार न्यूज

शासकीय योजनांचा लाभ मिळण्याऐवजी केवळ कागदावरच राहणाऱ्या योजना आणि प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ, साकूर पठार भागातील जांबुत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीने शुक्रवारी भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले. घरकुल, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित ठेवल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.


मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून घरकुल, हक्काची जागा, वीज जोडणी आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता ग्रामसभा उधळून लावण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

Oplus_0

आंदोलकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

१. पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा.
२. घरकुलासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून द्यावी.
३. आदिवासी वस्त्यांवर वीज जोडणी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
४. आरोग्य सुविधा आणि इतर शासकीय कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी.


या आंदोलनाची माहिती मिळताच एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल भाऊ बर्डे, टायगर फोर्सचे उपतालुकाध्यक्ष गणीभाई मोमीन, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब माळी, राहुरी टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ बडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरपंच सौ सोनाली शेटे , उपसंरपच सुभाष डोंगरे आणि ग्रामसेवकांना धारेवर धरले. “जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

दुपारी ४:३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनानंतर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने नमती भूमिका घेतली. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आदिवासी समाजाच्या सर्व अडीअडचणी आणि प्रलंबित कामे येत्या १० दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर एकलव्य संघटना आणि ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, १० दिवसांत कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल भाऊ बर्डे यांनी दिला आहे

यावेळी जांबुत गावातील कार्यकर्ते किशोर बर्डे बंडू निकम वैभव निकम दीपक बर्डे बाळू पवार माधुरी सोनाली बर्डे मंगल बर्डे जयश्री निकम सुनिता निकम असे अनेक कार्यकर्ते ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन केली

 

या आंदोलनात जांबुत गावातील आदिवासी महिला, तरुण आणि एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे साकूर पठार भागात प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती .

संरपच सौ सोनाली शेटे यांना आदीवाशी वस्तीत नेऊन परिस्थितीच्या गार्भिय दाखविण्यात आले खरोखर आदीवाशी समाज विविध समस्या पासून वंचित असल्याचे चित्र दाखविण्यात आले .

 

 

अनिल बर्डे ( तालुकाध्यक्ष : एकलव्य आदीवाशी संघटना )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *