पानोडी । झुंझार न्यूज
सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात आपली पिढी नेमकी कुठे चालली आहे? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे एका मोठ्या आध्यात्मिक सोहळ्यातून पालकांना मोलाचा इशारा देण्यात आला आहे. “मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपणच त्यांना वाईट सवयी लावतोय,” असे परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज कडलग यांनी व्यक्त केले आहे. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली.

संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. निमित्त आहे, गावात आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वसमावेशक अखंड हरिनाम सप्ताहाचे’. गुरुवारी या सप्ताहाचा तिसरा दिवस होता. सकाळपासूनच विठू नामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिला, तरुण आणि अबालवृद्धांच्या उपस्थितीने सप्ताहाच्या मंडपात भाविकांचा जणू महासागर लोटला होता.
यावेळी कीर्तन सेवा बजावताना ह.भ.प. अनिल महाराज कडलग यांनी आपल्या ओघवत्या आणि विनोदी, पण तितक्याच मार्मिक शैलीत समाजाच्या वास्तव परिस्थितीवर बोट ठेवले. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ‘मोबाईलचे व्यसन’. महाराज म्हणाले की, “मुलं रडायला लागली की आपण लगेच त्यांच्या हातात मोबाईल देतो. हीच ती वेळ आहे, जिथून आपण आपल्या पाल्याला वाईट सवयींची वाट दाखवतो.” मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मुले गुन्हेगारीकडे वळू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आई-वडिलांचा विसर पडत चाललेली पिढी सावरण्यासाठी केवळ ‘संस्कार’ हीच खरी शिदोरी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कडलग महाराज म्हणाले की , नुसता प्रपंच करून चालणार नाही, प्रपंचासोबत परमार्थही करा. जगात सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे संस्कार आहेत. आज मोबाईलमुळे संवाद हरवलाय, तो पुन्हा मिळवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार आत्मसात करा.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध नियोजन आणि अखंड महाप्रसाद सेवा. तिसऱ्या दिवशी पाबळ, गुळवे, शिंदे, साकुरे, शिरतार आणि गफले परिवाराच्या वतीने अन्नदानाची सेवा देण्यात आली. हजारो भाविकांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला. गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडत आहे.


