पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास; औद्योगिक क्षेत्राला मिळणार नवी उभारी
अहील्यानगर । झुंझार न्यूज
अहील्यानगर जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, ७८ उद्योजकांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे. उद्योजक आता निर्भयपणे जिल्ह्यात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतील, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने आयोजित ‘गुंतवणूक परिषदेत’ मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ७८ उद्योगांशी सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या माध्यमातून सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. कार्यक्रमात सर्व उद्योजकांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, उद्योजक अरविंद पारगावकर, औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

जिल्हा आता औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होणार
उद्योजकांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, “अहील्यानगर जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन मोठ्या औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. यापूर्वी औद्योगिक विकासात काहीसे नकारात्मक वातावरण होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत असलेल्या गुंतवणुकीचा मोठा लाभ जिल्ह्याला मिळत आहे.”
संरक्षण प्रकल्प आणि भविष्यातील योजना
जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर ‘निबे ग्रुप’च्या माध्यमातून पहिला संरक्षण प्रकल्प (Defense Project) येत आहे. भविष्यात बेलवंडी आणि हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्यान्वित होतील. यापूर्वी धाक आणि दडपशाहीमुळे अनेक उद्योग जिल्ह्याबाहेर गेले, अशी खंत व्यक्त करत त्यांनी आता उद्योजकांना पूर्ण संरक्षण आणि पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी उद्योग विभागाची असल्याचे स्पष्ट केले.
कार्गो हब आणि सेमीकंडक्टर प्रकल्प
जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते विकास आणि शिर्डी विमानतळाचा विस्तार वेगाने होत आहे. तिथे लवकरच ‘कार्गो हब’ निर्माण केले जाईल. तसेच जिल्ह्यात ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर ‘डेटा सेंटर’ उभारले जाणार असून, राज्य सरकार एकूण ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली.
लघू उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत तरुण आणि महिला उद्योजक पुढे येत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी नव्या उद्योजकांच्या धाडसाचे कौतुक केले. या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Post Views: 9



