{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त; पालकमंत्र्यांकडे बंदोबस्ताची मागणी

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा आणि रानडुकरांचा मोठा उपद्रव वाढला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या पाच मेंढ्या ठार झाल्या असून, रानडुकरांनी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

पिंप्री लौकी येथील शेतकरी व मेंढपाळ पोपटराव दातीर यांच्या मेंढ्यांवर मोकाट कुत्र्यांच्या १० ते १५ टोळक्याने दिवसाढवळ्या हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात पाच मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे दातीर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना आता मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक, विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुत्र्यांच्या दहशतीसोबतच रानडुकरांनीही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पोनाडी रोड ते दरा, पिंपरी फाटा आणि गीते वस्ती परिसरात गेल्या महिनाभरापासून रानडुकरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी ही डुकरे शेतात घुसून ऊस आणि मका पिके उद्ध्वस्त करत आहेत. एकाच रात्रीत मोठे क्षेत्र फस्त केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची टंचाई अशा संकटात असतानाच आता वन्यप्राण्यांनी घातलेल्या या हैदोसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते भारतराव पाटील गीते यांनी पशुसंवर्धन आणि वनविभागाला या घटनेची माहिती दिली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गावाच्या सरपंच संगीता गीते व उपसरपंच बाजीराव गीते यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. रानडुकरे आणि मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

वन विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *