वनविभागाकडून पंचनामा पूर्ण; ड्रोनद्वारे बिबट्याला जेरबंद करण्याची सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांची मागणी

 

झरेकाठी । झुंझार न्यूज 


संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकामागून एक पाळीव प्राण्यांवर हल्ले सत्र सुरूच आहे. मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सिद्धार्थ आबासाहेब वाणी यांच्या गट नंबर ११३ मधील वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून दोन शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी (भाग ३) दिलीप जिरे यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये वनरक्षक रामेश्वर हरिभाऊ मंडपे, वनपाल सुजित मारुती बोकडे, वनसेवक उत्तम भुसारी, वनसेवक नजीर शेख यांचा समावेश होता. सामाजिक कार्यकर्ते वरुण वाणी यांच्या उपस्थितीत बिबट्याने ठार केलेल्या शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला.


झरेकाठी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास संपत गेनू वाणी (गट नंबर १८२) यांच्या राहत्या घरी बिबट्याने हल्ला केला होता, ज्यामध्ये शेळी जखमी झाली होती. तसेच बाजीराव वाणी यांच्याही एका शेळीला बिबट्याने ठार केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरात संदीप वाणी यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी आहे.

 


एकाच परिसरात वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी वनविभागाकडे आक्रमक मागणी केली आहे की, वनविभागाने या घटनांकडे गांभीर्याने पाहावे. केवळ पंचनामे न करता, आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून या परिसरात बिबट्याचा शोध घ्यावा आणि त्याला तातडीने जेरबंद करावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी.

 

सध्या झरेकाठी परिसरात भीतीचे सावट असून रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. आता वनविभाग यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .