सोनगाव येथे ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस उत्साहात
झरेकाठी । झुंझार न्यूज
जीवन मंगलमय करायचे असेल तर रामायण कथा आणि मृत्यू मंगलमय करायचा असेल तर श्रीमद् भागवत कथा श्रवण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विख्यात कथाकार भागवताचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांनी केले. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या सहाव्या दिवशी ते बोलत होते.
रविवार, ९ जून रोजी सप्ताहाचे सहावे पुष्प गुंफताना मनोहर महाराज सिनारे यांनी आपल्या रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तरुण पिढीला उपदेश करताना महाराज म्हणाले की, “जीवनात रस्ता चुकला तरी निराश होण्याचे कारण नाही. अजामेळाच्या चरित्रातून आपण हाच बोध घेतला पाहिजे की, पुन्हा सन्मार्गावर येण्याची संधी प्रत्येकाला मिळते. केवळ देवावर विश्वास हवा.” गजेंद्र मोक्षाचा प्रसंग सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा सर्व सोबती साथ सोडतात, तेव्हा केवळ भगवंतच भक्ताला संकटातून मुक्त करतो.
सोनगाव आणि परिसरातील पंचक्रोशीतून सुमारे सहा ते सात हजार भाविक या कथेसाठी उपस्थित होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण सोनगाव परिसर भक्तिमय झाला होता.
कथा श्रवणानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोनगाव येथील ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या सर्व सदस्यांनी या महाप्रसादाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली.
श्री संत शिरोमणी सावता महाराज सप्ताह उत्सव समितीने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल महाराजांनी समितीचे कौतुक केले. कथेदरम्यान भाविकांची झालेली गर्दी आणि त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती.
या सप्ताहाची सांगता ११ ऑगस्ट रोजी भागवताचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांच्याच ‘काल्याच्या कीर्तनाने’ होणार आहे. या मंगलमयी प्रसंगी देखील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.