{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिपरिप पावसामुळे एका कष्टकरी शेतकऱ्यावर आभाळ फाटले आहे. येथील शेतकरी महादू आनंदा खेडकर यांची ६५ फूट खोल असलेली विहीर अचानक खचल्याने त्यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे केवळ विहिरीचेच नुकसान झाले नाही, तर त्यावर अवलंबून असलेला मत्स्यपालन व्यवसायही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर ५२३/४/२ मधील ही विहीर मूळची १९२६-२७ सालातील आहे. त्याकाळी ही विहीर ३० फूट खोल होती. मात्र, आपल्या शेतीला बारमाही पाणी मिळावे या जिद्दीतून महादू खेडकर यांनी २०१६ मध्ये पदरमोड करून या विहिरीचे खोलीकरण केले होते. सुमारे ४५ फुटांपर्यंत विहिरीचे सिमेंट काँक्रीटीकरण (कड) करण्यात आले होते. यामुळे विहिरीची एकूण खोली ६५ फूट आणि रुंदी २१ फूट झाली होती. वर्षानुवर्षांची मेहनत आणि मोठी पुंजी खर्च करून ही विहीर शेतीसाठी तयार करण्यात आली होती, मात्र एका पावसाने सर्व काही मातीमोल केले.

गेल्या काही दिवसांपासून पानोडी परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे विहिरीच्या आजूबाजूची माती खचली आणि सिमेंट काँक्रीटीकरण केलेले भक्कम बांधकाम पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, विहिरीचा आकार आता अंडाकृती झाला असून त्यात मोठ्या प्रमाणात पाला-पाचोळा आणि ढिगारा साचला आहे. विहिरीतील पाणी पांढरे पडले असून गाळामुळे विहीर पूर्णपणे बुजली गेली आहे. यामुळे खेडकर यांच्यासमोर आता सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

शेतकरी महादू खेडकर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून या विहिरीत मत्स्यपालन सुरू केले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी विहिरीत कटला, कोंबडा आणि चिलापी या प्रजातींची सुमारे दोन हजार माशांची पिल्ले सोडली होती. माशांची वाढ अतिशय चांगली झाली होती आणि त्यातून मोठे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र विहीर खचल्यामुळे बहुतांश मासे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जे मासे सध्या शिल्लक आहेत, त्यांनाही दूषित पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. मेलेल्या माशांमुळे पाणी खराब होऊन उर्वरित माशांचाही नायनाट होण्याची भीती खेडकर यांनी व्यक्त केली आहे.

कष्टाने उभी केलेली विहीर आणि मत्स्यपालन व्यवसाय डोळ्यादेखत नष्ट झाल्याने खेडकर कुटुंबियावर मोठे संकट कोसळले आहे. १५ लाख रुपयांचे हे नुकसान भरून काढणे एका सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “आमचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा उभं राहणं कठीण आहे,” अशा भावना खेडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेचा संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी पानोडी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *