कोपरगांव । झुंझार न्यूज

शेवटपर्वत समाजवादाचा पुरस्कार करून तळागाळातील उपेक्षीत जनतेची सुख-दुखे स्वतः झेलत अन्याय विरुद्ध संघर्ष करून डॉ कुमार गणेश सप्तर्षी यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या जाण्याने बुध्दीजीवी समाजवादाचा आंदोलनात्मक डॉक्टर हरपलाअशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. गांधीवादी विचारसरणीचे चालते बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले असेही ते म्हणाले.

           

ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांची अतुट मैत्री होती. प्रतिकूल परिस्थितीत तळागळातील गोरगरीब जनतेचे छोटे छोटे प्रश्न कसे सोडवायचे याबाबत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांच्यात सतत वैचारिक देवाण-घेवाण व्हायची. समाजवादाचा पुढाकार घेत त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच आपल्या आंदोलनाला दिशा देण्याचे काम केले, आतापर्यंत त्यांना सुमारे ३५ वेळा कारावास भोगावा लागला. तीन दशके त्यांनी सत्याग्रही विचारधारा मासिकातून परखड लिखाण करून जनमानसात वैचारिक चळवळ निर्माण केली. तत्कालीन पंतपधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात ते १९७८ मध्ये जनता पक्षातून अह‌मदनगर (अहिल्यानगर) मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी रजौली ग्राम (ता. नावदा) येथ१९६७ मध्ये मदत केंद्र चालविले, कोयना भूकंपग्रस्तांना मदत केली. १९८० ते १९८५ या दरम्यान कर्जत (अहिल्यानगर) तालुक्यात

खेडनगर येथे भारतीय समाज विकास संस्था स्थापन करून नर्सरी, लिंबोळी तेल वाटप, ससेपालन, मस्यशेती, गोपालन, संकरीत शेळीपालन, वनशेती असे लोकोपयोगी उपक्रम राबविले. स्वतःसाठी काही न घेता समाजाच्या परोपकारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने समाजवादाचे आंदोलनात्मक नेतृत्व हरपले अशा शब्दांत बिपिनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *