आश्वी । झुंझार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील औरंगपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी एका रात्रीत एक बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र, अद्यापही परिसरात तीन बिबट्यांचा वावर असल्याने वनविभागाचे लक्ष कायम आहे.

औरंगपूर येथील सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या गट नंबर २९४ या क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक नर बिबट्या, एक मादी आणि दोन बछडे असे एकूण चार बिबट्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरत होते, तर शेतीची कामेही खोळंबली होती. शालेय विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे सावट होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे व ग्रामस्थांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्याला यश येऊन शुक्रवारी वनविभागाकडून पिंजरा उपलब्ध करून देण्यात आला. वन कर्मचारी व अधिकारी साळवे, पवार आणि डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता गुंजाळ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. विशेष म्हणजे, पिंजरा लावल्याच्या पहिल्याच रात्री एक बिबट्या त्यात अडकला आणि जेरबंद झाला.


एका बिबट्याला पकडण्यात यश आले असले तरी, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरात अजूनही तीन बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे उर्वरित बिबट्यांचाही तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.


या मोहिमेवेळी औरंगपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे, अनिल तळवले, गणेश गोसावी, बाबासाहेब तांबे, उत्तम तांबे, सुधीर गुंजाळ, अरुण गुंजाळ, वैभव दिघे, सचिन अण्णा तळवले, रमेश तांबे, डॉ. संतोष तळवले, दागु चोपडे यांसह अनेक ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.


बिबट्याच्या दहशतीतून मुक्तता करण्यासाठी तातडीने पिंजरा उपलब्ध करून दिल्याबद्दल औरंगपूर परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *