हाॅस्पिटल कर्मचारी व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर शहरातील नामांकित मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पडताळणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटलमधील योजनेचा कर्मचारी आणि व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संगमनेर शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२५ रोजी तक्रारदाराच्या आईवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधील योजनेचा कर्मचारी सुभाष दगडू धादवड (वय २९, रा. घुलेवाडी फाटा, संगमनेर) याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर, पैसे दिल्यानंतर कोणतेही अधिकृत बिल मिळणार नसल्याचे सांगून रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शविल्याचा आरोप आहे.


तक्रारदाराने याबाबत हॉस्पिटलचे व्यवस्थापक सुजित दामोदर गायकवाड (वय ३४, रा. मालदाड रोड, संगमनेर) यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता, “जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही,” असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्याच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण संभाषणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग तक्रारदाराने केले होते. त्याची अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागणीचा प्रकार प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे समोर आले.


याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (दि. २० जुलै) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपी सुभाष धादवड आणि सुजित गायकवाड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


या घटनेमुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उपचारासाठी लाच मागितल्याच्या आरोपामुळे संगमनेरमधील मेडिकव्हर हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *