आश्वी । झुंझार न्यूज

आश्वी ते उंबरी बाळापूर या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या खचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या साईड पट्ट्या तातडीने भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केली आहे.

 


आश्वी बुद्रुक हे परिसरातील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. कनोली, मनोली, ओझर, कनकापूर, शेडगांव या ग्रामीण भागातील शेतकरी, दूध उत्पादक आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. तसेच, हा रस्ता जोर्वे मार्गे संगमनेरला जोडणारा असल्याने आश्वी परिसरातील नागरिकांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

गेल्या काही काळापासून या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता मुळातच अरुंद असल्याने समोरून एखादे मोठे वाहन आल्यास दुचाकी किंवा इतर वाहनधारकांना बाजूला होणे कठीण होते. रस्त्याला लागूनच मोठ्या ‘कपारी’ (खड्डे) पडलेल्या असून साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्या आहेत. यामुळे वाहन खाली उतरवताना ताबा सुटून अनेक अपघात घडले आहेत. अनेक वाहनधारक या कपारींमुळे जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

 

रुंदीकरणाची गरज, पण सध्या मलमपट्टी हवी
या रस्त्यावरील वाढती वाहतूक पाहता या मार्गाचे कायमस्वरूपी रुंदीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, रुंदीकरणाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, किमान सध्याची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने मुरुम टाकून साईड पट्ट्या भरून काढाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

आश्वी-उंबरी बाळापूर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. रस्ता अरुंद आणि साईड पट्ट्या नसल्यामुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन साईड पट्ट्या भराव्यात, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागेल.

आशिष शेळके (तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, संगमनेर)

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *