संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील गोरक्षवाडी परिसरात मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी अमोल मच्छिंद्र आरगडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरली. याच परिसरातील संदेश बाळासाहेब चोपडे आणि विलास वादक यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील पेट्या व इतर साहित्य बाहेर नेले. घराशेजारील गिनी गवतामध्ये हे साहित्य नेऊन त्याची झडती घेतली आणि मौल्यवान वस्तू घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
ही चोरी पहाटेच्या सुमारास झाल्याने ग्रामस्थांना सकाळी उशिरा या प्रकाराची माहिती मिळाली. एकाच वेळी तीन घरांमध्ये चोरी झाल्याने चोरट्यांनी परिसराची आधी रेकी (पाहणी) केली असावी आणि पूर्ण नियोजन करूनच हा डल्ला मारला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाठ यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले असून पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गोरक्षवाडीत झालेल्या या जबरी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चोरट्यांचे धाडस वाढल्याने आता घरात राहणेही असुरक्षित वाटू लागले आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिसांनी या चोरीचा छडा लावून आरोपींना तातडीने जेरबंद करावे आणि परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी निमगाव जाळीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाची नेमकी किंमत पंचनामा पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.