प्रवरेत १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ
झरेकाठी । झुंझार न्यूज
. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्याची कमतरता नाही; त्यांना केवळ योग्य संधी, मार्गदर्शन आणि सुविधा मिळण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडीया सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील अनेक गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याचे व्यासपीठ मिळत आहे. खेळातून सकारात्मक ऊर्जा, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. अहिल्यानगर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात आणखी पुढे नेण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०२६-२७ च्या शुभारंभप्रसंगी डाॅ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, विशाल गर्जे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक डॉ. महेश खर्डे, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. पवार, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या विद्या घोरपडे, क्रीडा संचालक डॉ. उत्तम अनाप, रमेश दळे, अतुल डे, कल्पना कडू, सुचित्रा तांबे, स्नेहल सुतार, श्वेता पाटील, नितीन शिरसाठ, धीरज मिश्रा आदी उपस्थित होते.
डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, “शिक्षण आणि खेळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दोन महत्त्वाची चाके आहेत.” प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडेला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये संधी मिळावी, त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.
खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहतेच; मात्र त्यासोबतच आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त आणि एकोप्याची भावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळालाही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवरेला राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मिळालेला मान हा संस्थेसाठी अभिमानाची बाब असून, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना राज्यातील विविध भागांतील गुणवंत खेळाडूंसोबत खेळण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळते. या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा आज क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी शाळा व महाविद्यालयांना आवश्यक क्रीडा साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे. केवळ विद्यार्थ्यांपुरतेच क्रीडा क्षेत्र मर्यादित न ठेवता सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायामाची आणि खेळाची सवय लागावी, यासाठीही विविध उपक्रम राबविले जात आहेत.
खेलो इंडिया’सोबत ‘मिशन लक्षवेध’च्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे. प्रवरेमध्ये लवकरच ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत हॉकीचे विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून, त्याचा ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास खुरंगे यांनी व्यक्त केला.अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, मागील वर्षी जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ९३ पदकांची कमाई करून जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहे.प्रवरा शैक्षणिक संकुलाने शिक्षणासोबत क्रीडेला दिलेले महत्त्व हे इतर शैक्षणिक संस्थांसाठी आदर्शवत असल्याचेही खुरंगे यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत नाशिक, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या विभागांतील नऊ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे लोणीच्या प्रवरा परिसरात क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्याच्या विविध भागांतून आलेल्या युवा खेळाडूंच्या कौशल्याला आणि जिद्दीला या स्पर्धेच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना निचळ यांनी केले, तर आभार नितीन शिरसाठ यांनी मानले.