“सध्याच्या काळात विद्यार्थ्यांची शिस्त बिघडत चालली असून ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षकांनी दिलेला शिस्तीचा मार खाऊ द्यावा, जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर पोलिसांचा मार खाण्याची वेळ येणार नाही,” असे परखड मत आश्वी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बर्डे यांनी सरदार थोरात विद्यालयाच्या पालक मेळाव्यात व्यक्त केले .
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार थोरात विद्यालयात विशेष पालक संप्रन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष विनायकराव थोरात होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्डे हे होते .
यावेळी संरपच गणपत हजारे ,पोलीस कॉन्स्टेबल गोपाळे , भगवानराव थोरात , सोसायटी चेअरमन बबनराव कराड, विठ्ठल घोडेकर , बाळासाहेब सानप , पत्रकार राजेश गायकवाड , संतोष चव्हाण , शंकर जाधव , संकेत तांबे , सोमनाथ गपले आदीसह पालक , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्डे यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देत म्हणाले की, कोणीही हौस म्हणून शाळेत किंवा पोलीस स्टेशनला जात नाही. विद्यार्थ्यांनी शाळेतील वातावरण खराब करू नये. जर एकदा का पोलिसांच्या ‘काळ्या कागदावर’ (गुन्हेगारी नोंद) तुमचे नाव आले, तर तुमचे संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त होईल. पालकांनी मुलांच्या वर्तणुकीवर लक्ष द्यावे. पाठीवर दोन प्रकारच्या थापा मिळतात; एक शाबासकीची आणि दुसरी चुकीच्या कृत्याबद्दल मिळणारी शिक्षा. प्रत्येकात शक्ती आहे, ती महापुरुषांच्या विचारातून जागृत करा. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या उच्चशिक्षित व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर, वकील, मंत्री, इंजिनियर, पोलिस , पत्रकार व्हा.
तर बर्डे पुढे म्हणाले की , ‘गुड टच-बॅड टच’ बद्दल मार्गदर्शन करताना मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘डायल ११२’ या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. प्रत्येक नागरिक आणि विद्यार्थ्याने पोलीस होऊन सजग राहिल्यास मुली सुरक्षित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भगवानराव थोरात म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांचा आणि पालकांचा योग्य धाक असणे आवश्यक आहे. तरच त्यांना चांगले वळण लागते. विद्यार्थी हा मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो, त्याला आकार देऊन सुबक मडके बनवण्याचे काम शिक्षक आणि पालक या कुंभारांनी मिळून करायचे आहे.
अध्यक्षीय भाषणात विनायकराव थोरात म्हणाले की, “कायद्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी आपली ताकद चुकीच्या कामासाठी न वापरता विधायक कामांसाठी वापरावी. जे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने वागतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पोपट सोनवणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता आणि विस्कळीत होत चाललेली शिस्त यावर चिंता व्यक्त केली. संकटातूनच सुधारणा होते, त्यामुळे पालकांनी मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गणपत हजारे यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना वाईट कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले, तर आभार घाडगे यांनी मानले.