संहिता राजन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य, सचिन शिंदे यांना नाट्यसेवा, तर मालती इनामदार यांना कलागौरव पुरस्कार
प्रवरा परिवारातर्फे ३६ व्या वर्षाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा
मराठी अभ्यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार; सुरेंद्र दरेकर,निवृत्ती जोरी आणि डॉ.संजय गोर्डे यांच्या साहित्यकृतींची पुरस्कारासाठी निवड
आश्वी । झुंझार न्यूज
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार संहिता राजन यांना, ‘राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ सचिन शिंदे यांना आणि ‘राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार’ मालती इनामदार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंती दिनी साहित्य, कला, नाट्य आणि प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम प्रवरा परिवाराने सुरू केलेला आहे. यंदाचे पुरस्काराचे हे ३६ वे वर्ष आहे. पद्मश्रींच्या जयंती दिनी गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी नारळी पौर्णिमेला प्रवरानगर येथे राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या निवड समितीत अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासह डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंगडे आणि प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पाहिले.

यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार ते साहित्यिक असा यशस्वी प्रवास करताना समाजातील शोषित, वंचित घटकांचे दुःख समजून घेत आणि पत्रकारितेत फील्डवर काम करताना आलेले अनुभव साहित्याच्या माध्यमातून वाचकांसमोर आणण्याच्या त्यांच्या यशस्वी प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

“समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ (रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह) पुणे येथील संहिता राजन यांच्या ‘चल गं सये वारुळाला’ या कथासंग्रहास दिला जाणार आहे. त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या आघाडीच्या तरुण लेखिका असून, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्त्री संगणक अभियंत्यांच्या अस्तित्वाभोवती निर्माण झालेल्या नव्या नेपथ्याची मांडणी त्यांच्या लिखाणातून करुन त्याचे भेसूर चित्र त्यांनी कथानकाच्या माध्यमातून पुढे आणले आहे.

मानवी व्यवहाराचे, जीवन व्यवहाराचे, नातेसंबंधांचे, कौटुंबिक संरचनेचे आणि भवतालच्या समाज व्यवहाराचे सूक्ष्म व अंतर्गत अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या सुरेंद्र दरेकर यांच्या ‘समर ऑफ सेवंटी नाईन’ या कादंबरीस ‘राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार’ (रुपये २५ हजार आणि स्मृतिचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.”

“नाट्य प्रयोगांपासून ते प्रायोगिक नाटकांसाठी काम करतानाच ‘नाट्यचौफुला’ अंतर्गत सलग चार नाट्य प्रयोगांचे महाराष्ट्रभर प्रयोग आणि एकूण ३५ नाटके व ५० हून अधिक एकांकिकांचे दिग्दर्शन करणारे सचिन शिंदे यांना ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ यंदाच्या वर्षी जाहीर झाला आहे. आपल्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्याकडून नृत्य व संगीताचे धडे घेऊन तमाशा कलेला पुढे घेऊन जाणाऱ्या मालती इनामदार यांना ‘राज्यस्तरीय कलागौरव तमाशा कलावंत पुरस्कार’ (रुपये २५ हजार आणि स्मृतिचिन्ह) देऊन गौरविले जाणार आहे.

मराठी भाषेच्या हितासाठी व समृद्धीच्या अनुषंगाने पूरक ठरणारे कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद असे उपक्रम आयोजित करून, मराठी भाषेसाठी समर्पित भावनेने काम करणारी संस्था म्हणून मराठी अभ्यास परिषदेची ओळख आहे. या संस्थेस यावर्षी ‘राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्कार’ देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून, याही पुरस्काराचे स्वरूप रुपये २५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे.


