झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील मगर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) दिवसाढवळ्या बिबट्या कुत्रा आणि मांजराचा पाठलाग करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मगर वस्ती परिसरात सोमवारी दुपारी बिबट्या मानवी वस्तीजवळ फिरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आला. दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार पाहून परिसरात खळबळ उडाली. शेतकरी शेतीच्या कामासाठी बाहेर पडताना घाबरत असून, शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बिबट्याचा वावर वारंवार आढळत असल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे, वनपाल आर. के. पवार, ए. व्ही. साळवे आणि वनरक्षक बाळासाहेब डेंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केल्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या पथकाने गस्त वाढवली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, वनविभागाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर तब्बल २४ तासांनी वनविभागाने पिंजरा लावला. आता पिंजरा लावून तीन दिवस उलटले तरी बिबट्याचा शोध लागलेला नाही. “वनविभागाकडे मोठ्या प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध असतानाही त्यांच्याकडून कामात हलगर्जीपणा होत आहे,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून मानवी वस्तीतील भीती दूर करावी, अशी मागणी सादतपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *