संगमनेर मधील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन
डी जे बंदी करून 25 वर्षांपासून सोमेश्वर मंडळांनी महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवला – लोकनेते बाळासाहेब थोरात

पारंपारिक वाद्यात व मोठ्या उत्साहात मानाच्या गणपतीची मिरवणूक
संगमनेर
संगमनेरच्या सोमेश्वर गणेश मंडळाला 131 वर्षांची मोठी समृद्ध परंपरा आहे. 2002 मध्ये डी जे व गुलाल बंदी करून सोमेश्वर गणेश मंडळांनी महाराष्ट्रापुढे आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळामधून विघ्नहर्ता गणरायाने महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करून त्यांच्या आशीर्वादाने उर्वरित काळामध्ये राज्यामध्ये भरपूर पाऊस पडून शेतकरी व सर्व नागरिक सुखी समाधानी होऊदे अशी प्रार्थना काँग्रेस पक्षाचे नेते मा. कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गणेश चरणी केली आहे.
रंगार गल्ली येथील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, आ.अमोल खताळ, सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सोमेश्वर मंडळाचे अध्यक्ष रोशन आमले, कार्याध्यक्ष अभिजीत पाटणकर, उपाध्यक्ष संकेत काजळे, ऋषिकेश पवार, अक्षय ढोरे, प्रथमेश गरुडकर, देवेंद्र काळे, कैलास बोरसे, मार्गदर्शक किशोर पवार, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शासकीय अधिकारी आणि संगमनेर मधील सर्व पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारंपारिक पद्धतीने मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरच्या मानाच्या गणपतीला 131 वर्षांची मोठी समृद्ध परंपरा आहे. डी जे बंदी बाबत यावर्षी महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे व आपण मात्र 2002 मध्येच डी जे व गुलाल बंदी केली होती. अत्यंत शिस्तीने आणि शांततेने मिरवणूक पुढे न्यायची ही आपली मोठी परंपरा आहे. पारंपारिक वाद्य व पारंपारिक खेळ हे या सोमेश्वर मानाच्या गणपतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. महाराष्ट्राला आदर्श परंपरा देण्याचे काम सोमेश्वर मंडळाने केले असून एक अत्यंत चांगली परंपरा निर्माण केली आहे. गेली अनेक वर्ष या मानाच्या गणपतीचे पूजन सकाळीच आपल्या हस्ते होत असते. ईश्वर कामांमध्ये कधीही मानापमान नसतो. आपण कायम चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहिलो आहे.
यावर्षी राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ईश्वर कृपेने आपली धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणातून थेट पाणी संगमनेरकरांना मिळत आहे. ग्रामीण भागात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये विघ्नहर्ता गणरायाच्या आशीर्वादाने उर्वरित काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा नागरिक महिला व सर्व नागरिक आनंदी व सुखी होऊ दे व येणारा सणासुदीचा काळ सर्वांना आनंदाचा जाऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर या ऐतिहासिक शहरांमध्ये सोमेश्वर मंडळांनी 131 वर्षांची ऐतिहासिक परंपरा निर्माण केली आहे. सोमेश्वर गणेश मंडळांनी डी जे व गुलाल मुक्त मिरवणुकीची परंपरा जपली आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे नागरिक व शेतकरी चिंतेत आहे. गणरायाच्या आशीर्वादाने पुढील काळात पाऊस पडावा अशी प्रार्थना त्यांनी केली. याचबरोबर संगमनेर शहरांमध्ये मोठ्या उत्साहाने नागरिकांनी गणेशोत्सव साजरा केला. लोकनेते बाळासाहेब थोरात व आपण विविध ठिकाणी आरत्यासाठी गेलो यावर्षीचे देखावे हे पाहण्यासारखे होते. लवकर देखावे खुले केल्यामुळे अनेकांना देखावे पाहता आले. शांततेत आणि आणि आनंदाच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव पार पाडला.
तर नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, गणेश उत्सव नवरात्र व येणाऱ्या सणासुदीच्या काळासाठी नगरपरिषदेने नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. सोमेश्वर मंडळांनी यावर्षी जगन्नाथ पुरीचा देखावा या ठिकाणी सादर केला शहरांमध्ये ऐतिहासिक व धार्मिक देखावे मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी निर्माण केले. यांना सर्व गणेश भक्तांनी भेटी दिल्या. या सर्व काळामध्ये नागरिकांनी ही मोठी मदत केली. आनंदाचे हे पर्व सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून गणेश विसर्जन ही सर्वांनी शांततेने करावे असे त्या म्हणाल्या याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पारंपारिक लाठीकाठी, मैदानी खेळ, शिवकालीन खेळ, यांची प्रात्यक्षिके झाली. यावेळी संगमनेर शहरातील नागरिक महिला युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


