आश्वी | झुंजार न्यूज

आज देशातील शेतकरी, कामगार उद्ध्वस्त केला जात आहे. दुसरीकडे रोजगार आणि नोकऱ्याही शिल्लक राहणार नाहीत, अशी परिस्थिती बनली आहे. त्यामुळे देशात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील पुढील पिढीच्या सुरक्षेसाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महत्त्वाची ठरणार आहे, अशी भावना मणिपूर येथून सुरू झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत प्रवास करणारे नगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द गावातील शेतमजूर लक्ष्मण वाल्हेकर यांनी व्यक्त केला. यात्रेदरम्यान आपला देश विविधतेत एकता टिकवून असल्याचा अनुभव घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मण वाल्हेकर यांनी राहुल गांधी यांच्या जथ्थ्याच्या पुढे झेंडा फडकवत आपली ही यात्रा पूर्ण केली. वाल्हेकर यांचे संगमनेर तालुक्यात आश्वी हे गाव आहे. ते शेतमजुरीचे काम करतात. कुटुंबाची जबाबदारी असली तरी येत्या काळात देश सुरक्षित राहिला पाहिजे, या उद्देशाने या यात्रेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरपासून मुंबईत येईपर्यंत अनेकदा राहुल गांधी यांनी आपली विचारपूस केली. त्यांच्यातील प्रेमळ माणूस मला जवळून अनुभवता आला, असे त्यांनी सांगितले.

 

राहुल गांधी यांची न्याय यात्रा मणिपूरहून निघाल्यानंतर ज्या-ज्या राज्यांत गेली त्या-त्या राज्यांत नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा देत स्वागत केले. विशेषतः महिला, शेतकरी, कामगार, शेतमजूर यांचा पाठिंबा लक्षणीय होता. काही ठिकाणी उद्योगधंद्यातील उद्योजक, नोकरदारही भेटत होते, अशी माहिती त्यांनी दिली. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आमच्याकडे असलेल्या कूळ कायद्याच्या लहान-मोठ्या जमिनी बळकवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवर देशभरात न्याय यात्रा दाखल झाल्यानंतर जोरदार स्वागत झाले. तसेच यापुढेही देशाच्या सुरक्षेसाठी, अशा यात्रांमध्ये सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 

चौकट

देश एकसंघ !

आपला देश हा विविधतेत एकता टिकवून आहे. विविध भाषा, संस्कृती जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपला देश एकसंघ आहे. ही बाब मला राहुल गांधी यांनी काढलेल्या मणिपूरपासून ते मुंबईपर्यंतच्या न्याय यात्रेत खूप जवळून अनुभवता आली, असे लक्ष्मण वाल्हेकर यांनी सांगितले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *