{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

अभिषेक चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दमदार कामगिरी !

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर संघर्षाच्या वाटेवरूनही यशाच्या शिखरावर पोहोचता येते, हे राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील चि. अभिषेक सिताराम चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत, प्रसंगी स्वतः बँड पथकात वाद्य वाजवत शिक्षणाचा खर्च भागवत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अभिषेक चव्हाण यांची दुय्यम निबंधक श्रेणी-१ या पदावर निवड झाली आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून त्यांनी २७३.५० गुण मिळवत सहावा क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कोंढवड गावासह संपूर्ण राहुरी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अभिषेक यांच्या संघर्षमय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अभिषेक यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टांचा मोठा वाटा आहे. एका बाजूला हातात बँडचे वाद्य घेऊन घाम गाळणारे वडील सिताराम मारुती चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला मोलमजुरी करून कुटुंबाच्या संसाराचा गाडा ओढणारी आई, अशा कष्टकरी आई-वडिलांच्या संघर्षातून अभिषेक यांच्या मनात शिक्षणाची आणि मोठे होण्याची जिद्द निर्माण झाली.

विशेष म्हणजे, शिक्षण घेत असताना अभिषेक यांनीही आपल्या वडिलांसोबत बँड पथकात काम केले. हातात पुस्तक आणि दुसऱ्या बाजूला बँडचे वाद्य, अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. बँड वाजवून शिक्षण पूर्ण करणाऱ्या अभिषेक यांनी आज आपल्या कष्टाच्या जोरावर क्लास वन अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

अभिषेक यांच्या आयुष्याला आजोबा मारुती गणपत चव्हाण आणि आजी गयाबाई गणपत चव्हाण यांच्या संस्कारांचीही भक्कम शिदोरी लाभली. कष्टाचे महत्त्व, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि संकटाच्या काळातही खचून न जाण्याची शिकवण त्यांनी आपल्या आजी-आजोबांकडून घेतली. हीच शिकवण त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात त्यांच्या पाठीशी राहिली. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आर्थिक अडचणी, अभ्यासासाठी उपलब्ध साधनांची मर्यादा आणि अनेक अडथळे त्यांच्या वाट्याला आले. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. परिस्थिती बदलण्याची आस आणि आपल्या कुटुंबाने घेतलेल्या कष्टाची चीज करण्याची जिद्द त्यांच्या प्रत्येक प्रयत्नामागे होती. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर यशाला गवसणी घातली.
अभिषेक यांच्या या यशानंतर कोंढवड गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले तसेच संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील माजी सरपंच विशाल परमार यांनी अभिषेक चव्हाण यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अभिषेक यांचे आजोबा मारुती गणपत चव्हाण, आजी गयाबाई गणपत चव्हाण, वडील सिताराम मारुती चव्हाण, भाऊ अनिकेत सिताराम चव्हाण, बहीण अक्षदा सिताराम चव्हाण, माजी सरपंच मामा विशाल परमार, मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार विजय परमार यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
अभिषेक यांच्या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातून तसेच राहुरी परिसरातून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे.


अभिषेक चव्हाण यांचा हा संघर्ष केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नसून, ‘परिस्थिती माणसाला थांबवू शकते; मात्र जिद्द असेल तर ती त्याला हरवू शकत नाही’, असा संदेश देणारी प्रेरणादायी कहाणी आहे. बँडचे वाद्य वाजवत शिक्षण पूर्ण करणाऱ्या या तरुणाने आज आपल्या कर्तृत्वाने क्लास वन अधिकारी होण्याचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे त्यांच्या यशाचा हा गौरव संपूर्ण राहुरी तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.


_______________________________________________

“अभिषेकची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. मात्र शिक्षण घेण्याची त्याची जिद्द कधीच कमी झाली नाही. त्याचे वडील आणि स्वतः अभिषेक अक्षरशः बँड पथकात काम करत होते. बँड वाजवत अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने मिळविलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद असून, त्याचा संघर्ष आणि यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”

माजी सरपंच विशाल परमार

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *